आळंदी पालिकांच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांची वाढतीय संख्या

विलास काटे
Wednesday, 11 November 2020

आळंदी पालिकेच्या विविध ठिकाणी रस्त्यांच्या कडेला मोकळ्या जागा आहेत. मात्र दहा वर्षात अतिक्रमण करून कुणी राहण्यासाठी तर कुणी व्यावसायासाठी बांधकामे केली. विशेष म्हणजे राजकीय लोकांचा आश्रय आणि प्रशासनाने केलेल्या अर्थपूर्ण कानाडोळ्यामुळेच बांधकामे झाली. चाकण चौकातील वाहनतळाच्या समोर सुलभ शौचालयाला लागून एका महाभागाने टुरिस्टचे कार्यालय थाटले. 

आळंदी : राजकीय लोकांची मनमानी आणि प्रशासनातील कर्मचारी कार्यालयातून बाहेरच पडत नसल्याने शहरात अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला. नुकतेच आळंदी पुणे रस्त्याचे डांबरीकरण आणि ड्रेनेजचे कामासाठी नवीन एसटी स्थानकापुढील झोपडी हटवून विकासकाम केले. मात्र काम पूर्ण झाल्यावर रात्रीतून नव्याने शेडबांधकाम केले तर सुलभ शौचालयाच्या मोकळ्या जागेत एका महाभागाने अतिक्रमण करून वातानुकूलित टुरिस्ट कार्यालय खोलले. पालिकांच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांची संख्या वाढतच चालली.

आळंदी पालिकेच्या विविध ठिकाणी रस्त्यांच्या कडेला मोकळ्या जागा आहेत. मात्र दहा वर्षात अतिक्रमण करून कुणी राहण्यासाठी तर कुणी व्यावसायासाठी बांधकामे केली. विशेष म्हणजे राजकीय लोकांचा आश्रय आणि प्रशासनाने केलेल्या अर्थपूर्ण कानाडोळ्यामुळेच बांधकामे झाली. चाकण चौकातील वाहनतळाच्या समोर सुलभ शौचालयाला लागून एका महाभागाने टुरिस्टचे कार्यालय थाटले. 

हे ही वाचा : न्हावरा (ता.शिरूर) येथील महिलेवर हल्ला करुन दोन्ही डोळे निकामी करणारा आरोपी अखेर गजाआड

अतिक्रमण केलेच पण त्यामधे एसीही बसवली. त्याला वीज कनेक्शनही बेकायदा दिले गेले. त्याचप्रमाणे देहूफाटा येथे नवीन एसटी स्थानकासमोर अनेक वर्षे झोपडी होती. मात्र नुकतेच रस्ता रूंदीकरण आणि ड्रेनेजसाठी झोपडी हटवून विकासकाम केले. मात्र मागील आठवड्यात रात्रीतून पुन्हा शेड उभे राहिले. आळंदीत गार्डनच्या भिंतीलगत असेच एकाने म्हशींचा गोठा बांधला. चाकण चौकात रस्त्यालगत घरे बांधली कुणी किराणा मालाची दुकाने थाटली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

जुन्या एस टी स्थानक, चाकण केळगाव रस्ता, मरकळ रस्त्यावरही असेच अनाधिकृत शेड बांधकाम झाले. अवैध बांधकामातून व्यावसायिक गेली काही वर्षे वापरत असून दहा ते पंधरा हजार रूपये भाडे एका दुकानाचे मिळतात. पालिका मात्र त्यावर कोणताही कर लावत नाही. बांधकाम पाडण्यासाठी कारवाई नाही. 

आळंदीत अवैध आणि अनाधिकृत बांधकामामधे नगरसेवकही मागे नाही. कुणी पूरनियंत्रण रेषेत बांधकाम केले. कुणी अवघ्या शंभर चौरस फुटात चार मजले बांधकाम केले. गावठाणात एका महाभागाने पाच मजली बांधकाम केले. बांधकामाच्या भोवती नियमाप्रमाणे जागा सोडली जात नाही. पार्किंगच्या जागेतही बांधकाम केले जात आहे.

हे ही वाचा : गेल्या दहा वर्षांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान असलेले यंदा ठरले दुसरे वर्ष

पालिकेत निवडून दिलेले नगरसेवकच अवैध बांधकाम करत असतील तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ. प्रशासनातील कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर पडत नाहीत. कार्यालयात बसून आतबट्ट्यांचा व्यवहार करून कर्मचारी गडगंज होत आहेत. शहर मात्र बकाल होत असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या जागांवर अतिक्रमण झाले तर पालिकेच्या विकासकामांसाठी आणि पुन्हा रस्ता रूंदीकरणासाठी पालिकेला याच लोकांशी वाद घालावा लागणार याचेही भान प्रशासन आणि राजकीय मंडळींना नसल्याचे चित्र आहे.

याबाबत मुख्याधिकारी अंकुश जाधव व बांधकाम विभागप्रमुख संघपाल गायकवाड म्हणाले, बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाचे गस्ती पथक तयार केले जात आहे. दिवाळीनंतर १८ नोव्हेंबरपासून गस्ती पथकातील कर्मचारी अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करतील. पालिकेच्या जागेतील सर्व अतिक्रमण हटविले जाईल.

- नवीन एसटी स्थानकाच्यालगत रात्रीतून अवैध शेडबांधकाम
- चाकण चौकात पालिकेच्या जागेत घर आणि दुकानांसाठी बांधकाम
- देहूफाटा, केळगाव चाकण रस्ता, मरकळ रस्ता, आराधना हॉटेलसमोर अवैध - व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम
- अवैध बांधकामांची नोंद नाही आणि कर नाही
- न्यायालयीन निकाल लागूनही पालिकेने जागा रिकाम्या करून घेतल्या नाहीत
- शंभर चौरसफूटातही तिनचार मजली बांधकाम सुरू

संपादन- सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of encroachments and unauthorized constructions on vacant lands of Alandi Municipality is increasing