आंतरराष्ट्रीय प्रवासाला लोहगावची बिकट वाट

आंतरराष्ट्रीय प्रवासाला लोहगावची बिकट वाट

पुणे - लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणात ५ टक्‍क्‍यांनी, तर प्रवाशांच्या संख्येत ११ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्यातच लुफ्तांसा एअरलाइन्सची फ्रॅंकफर्ट मार्गावरील सेवा शनिवारपासून बंद झाली आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधांचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर झाला आहे. 

लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या मात्र वाढत आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत १४ टक्‍क्‍यांनी, तर विमान उड्डाणांच्या संख्येत सुमारे १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या घटली आहे. पुण्यातून दुबईसाठी स्पाईस जेट आणि एअर इंडिया एक्‍स्प्रेस, सिंगापूर आणि अबुधाबीसाठी जेट एअरवेजची विमानसेवा आहे. लुफ्तांसा एअरलाइन्सची फ्रॅंकफर्टसाठी विमानसेवा होती, परंतु गेल्या महिन्यात सुरू झाल्यावर ती २ फेब्रुवारीपासून पुन्हा बंद पडली. गेल्या वर्षांतही ती वारंवार बंद पडली होती. त्यामुळे युरोपला जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई, दिल्ली, हैदराबादवरून जावे लागत आहे. यामुळेही पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या  घटली आहे. 

सिंगापूरसाठी पुण्यातून १ डिसेंबरपासून थेट विमानसेवा सुरू झाली. या मार्गावरील प्रवाशांची संख्या आता वाढू लागली आहे, असे जेट एअरवेजकडून सांगण्यात आले. लोहगाव विमानतळावरील धावपट्टी मुंबई-दिल्लीच्या तुलनेत लहान आहे. त्यामुळेही मोठ्या आकाराची विमाने लोहगाव विमानतळावरून उड्डाण करू शकत नाहीत. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर आणि पर्यायाने प्रवाशांच्या संख्येवर झाला आहे.

फ्रॅंकफर्ट मार्गावरील विमानसेवा पुण्यातून खंडित झाल्यामुळे युरोपमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुण्यातील धावपट्टी आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या पुण्यातून सेवा सुरू करण्यास इच्छूक असूनही त्यांना सेवा सुरू करता येत नाही.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ  

पुण्यातून युरोपात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. ‘इंटरनॅशनल कनेक्‍टिव्हिटी’ चांगली झाल्यावर ही संख्या वाढू शकते. सध्या कमी झालेली प्रवासी संख्या थायलंडसारख्या ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा सुरू झाल्यावर वाढू शकते. 
- विश्‍वास केळकर, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ पुणे 

लुफ्तांसाची विमानसेवा काही कारणांमुळे बंद झाली आहे. ती पुन्हा लवकरच सुरू होईल. विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर लवकरच अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील आणि प्रवाशांची संख्याही वाढेल. 
- अजयकुमार, संचालक, लोहगाव विमानतळ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com