बालवाडीतही पोषण आहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

महापालिकेने बालवाडी वर्ग सुरू केल्यापासून मुलांना पोषण आहार देण्याची मागणी होती. परंतु महापालिकास्तरावर ठोस निर्णय झाला नाही. अनेक वर्षे केलेल्या पाठपुराव्यामुळे या वर्षी मुलांना पोषण आहार मिळाला आहे. या उपक्रमामुळे पटसंख्या वाढण्यास मदत होईल.
- संजीवनी मुळे, मुख्य समन्वयिका, बालवाडी विभाग, महापालिका

पिंपरी - महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विकास समितीने अखेर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. या समितीने गेल्या ३० वर्षांत विद्यार्थिभिमुख उपक्रम राबविला नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांअभावी बालवाड्या ओस पडल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या आहाराने आनंदी झालेले मुलांचे चेहरे बालवाड्यांमध्ये पाहायला मिळाले. 

शहरात महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सुमारे २०७ बालवाड्या सुरू आहेत. या बालवाड्यांमध्ये आठ हजार मुले शिक्षण घेत आहेत. खासगी बालवाड्यांच्या तुलनेत महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये मुलांची पटसंख्या कमीच आहे. महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये येण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी गणवेश, दप्तर, खाऊ आणि बौद्धिक खेळणीवाटपाची गरज होती. मात्र गेल्या ३० वर्षांमध्ये असा कोणताच उपक्रम या महिला व बाल कल्याण विकास समितीने राबवला नव्हता. त्यामुळे बालवाडीची पटसंख्या वाढण्याऐवजी घटत होती. बालवाडीच्या महापालिकेतील मुख्य समन्वयिका संजीवनी मुळे यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या तीस वर्षांत याविषयी कार्यवाही झाली नव्हती. 

महिला व बाल कल्याण विकास समितीसमोर २०१२ मध्ये मुळे यांनी पुन्हा एकदा प्रस्ताव ठेवला. परंतु तत्कालीन समिती सदस्यांनी ‘गरज नसल्याचा’ शेरा मारल्याने प्रस्ताव दप्तरी दाखल झाला होता. मात्र समितीच्या माजी सभापती सुनीता तापकीर यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करून हिरवा कंदील दाखवला. नागरवस्ती विभागाकडून अखेर या खर्चाला मान्यता मिळवली. या आहारासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या खर्चातून सहा दिवस मुलांना शंभर ग्रॅमपर्यंतचा आहार मिळणार आहे. त्यात कडधान्याची उसळ, पुलाव, उपीट, राजगिरा, शेंगदाणा आणि चुरमुरा लाडू मिळणार आहे. त्यासाठी मुलांचा छोटा आणि मोठा गट तयार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutrition food in Kindergarten Municipal