पोषण आहाराची ताटे गेली कुठे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

अडगळीत ताट-वाट्या
शाळेच्या अडगळीच्या खोलीत ताट, वाट्या पोत्यात बांधून ठेवली आहेत. निकृष्ट दर्जाची भांडी आहेत, धुतली की गंज चढतो, असे शाळांमधील सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुलांची ताट व वाट्या धुण्याचा कामे त्यांना दिली. परंतु, ते टाळण्यासाठी मुलांना खिचडी ताटात दिली जात नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

पिंपरी - विद्यार्थ्यांना दुपारी शाळेत पोषक आहार मिळावा, या हेतूने केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. त्याअंतर्गत सरकारने मुलांना जेवणासाठी स्टीलचे ताट, वाटी व ग्लास पुरवले. परंतु, ते धुणार कोण? त्यामुळे डब्यातच आहार दिला जातो. मात्र, शाळांना पुरविलेली ताट, वाट्या गेली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे मुख्याध्यापकही दुर्लक्ष करत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत उघडकीस झाले आहे.

महापालिका आणि अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक ४४२ शाळांमध्ये केंद्र सरकारकडून शालेय पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी मुलांना ताट आणि वाट्या किंवा डबा (टिफीन) घरूनच आणायला सांगत. त्यामुळे ही योजना सुरवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली. वह्या, पुस्तकांचे ओझे, त्यातच ताट-वाटी यामुळे दप्तरे फाटत होती. त्यामुळे मुलांनी घरून आणलेल्या डब्यातच खिचडी खायला सुरवात केली. 

तो छोटा असल्याने आवारातच सगळीकडे भात पडलेला असायचा, तुडवला जायचा. हे चित्र बदलण्यासाठी मनसेचे शहर सचिव रूपेश पटेकर यांनी २०१५ मध्ये मुलांना ताट, वाटीतच खिचडी वाटप करण्याची मागणी केली. त्यावर शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी सत्यवान सोनवणे व शालेय पोषण आहार विभागाने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून महापालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये खिचडीसाठी ताट, वाट्या पुरविल्या. परंतु, गेल्या पाच वर्षांपासून अजूनही विद्यार्थ्यांना जेवणासाठी डबे आणावे लागत आहेत.

बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ताट आणि वाटी पुरवली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताटातच जेवण केले पाहिजे. तशा सूचना मुख्याध्यापकांना करण्यात येतील.
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutrition Food Scheme Student