#FCPooja फर्ग्युसन महाविद्यालयतील सत्यनारायण पूजेला आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे : समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा सांगणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रकार गुरुवारी झाला. शैक्षणिक संस्थेत झालेल्या कर्मकांडाच्या या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण चांगलेच तापले. 

पुणे : समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा सांगणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रकार गुरुवारी झाला. शैक्षणिक संस्थेत झालेल्या कर्मकांडाच्या या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण चांगलेच तापले. 

फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रवेश विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सत्यनारायण पूजा केली. शैक्षणिक संस्थेच्या आवारात अशा पद्धतीची पूजा घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत काही संघटनांनी याला विरोध केला. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकतांत्रिक युवा जनता दलाच्या वतीने महाविद्यालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यात दलाच्या कार्यकर्त्यांसह अन्य विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन घोषणाबाजी केली. समाज सुधारणा, परिवर्तनाच्या चळवळींसह देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असणारे फर्ग्युसन महाविद्यालय धर्मकांडाला बळ देणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेचाही साक्षीदार झाल्याची चर्चा दिवसभर शिक्षण वर्तुळात चांगलीच गाजली. 

"महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 40 वर्षांपासून कार्यालयात सत्यनारायणाची पूजा करत आहेत. परंतु यासंदर्भात शिक्षण संस्थांशी संबंधित कायदे आणि नियमावलीचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच, डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.'' 
- डॉ. रवींद्र परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय 

"सत्यनारायणाच्या पूजेला विरोध किंवा पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच नाही. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक अनुष्ठानाचा हा विषय आहे. परंतु अशा पद्धतीने विरोध होत असेल, तर आपण विवेक हरवून बसलो आहोत असे वाटते. '' 
- अद्वैत पत्की, प्रसिद्धीप्रमुख, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 

"सरकारचे अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थेत कोणत्याही विशिष्ट धर्माचे कर्मकांड करता येत नाही. अशा गोष्टींचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातत्याने निषेध केला आहे. सरकारी जागेत, वेळेत या गोष्टी करणे योग्य नाही.'' 
- मिलिंद देशमुख, प्रधान सचिव, अंनिस 
 

Web Title: objection on satyanarayan pooja in fergusson college