दौंड जिल्ह्यात विठुनामाचा गजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

दौंड - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परंपरेप्रमाणे आज दौंड व बारामती तालुक्‍यांतील १४ ग्रामदैवतांच्या पालख्यांनी शहरातील पुरातन मंदिरात हजेरी लावली. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. 

दौंड - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परंपरेप्रमाणे आज दौंड व बारामती तालुक्‍यांतील १४ ग्रामदैवतांच्या पालख्यांनी शहरातील पुरातन मंदिरात हजेरी लावली. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. 

भीमा नदीच्या तीरावर असलेल्या दौंड शहरातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आज पहाटे श्री विठ्ठल, राही व रखुमाई यांच्या मूर्तीस इंद्रजित जगदाळे पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सुधीर गटणे व कुटुंबीयांनी पूजा केली, तर प्रीतम राजहंस यांनी पौराहित्य केले. प्रथेप्रमाणे कुरकुंभ मोरी परिसरात गावचे पाटील जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी पालख्यांचे स्वागत करून पूजन केले. अग्रभागी असलेले व सजविलेल्या बैलगाडीवरील वाद्यपथक, ढोल-ताशा व झांज पथकाच्या तालावर भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. हुतात्मा चौकात नगराध्यक्षा शीतल कटारिया, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात व पदाधिकाऱ्यांनी पालख्यांचे स्वागत केले. 

पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी शहर व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. चौदा ग्रामदैवतांच्या पालख्यांसह शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांची पालखी दुपारी भीमा नदीवर स्नान करून गाववेशीतून श्री भैरवनाथ मंदिरमार्गे श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाली. 

शहरातील रोटरी सर्कलपासून सहकार चौक, शालिमार चौक, वाल्मीकी मंदिर, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी चौक, महात्मा गांधी चौक, भाजी मंडई, भैरवनाथ गल्ली या पालखी मार्गावर विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीने पालख्यांसमवेत आलेले वारकरी आणि भाविकांसाठी फराळाचे पदार्थ व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. 

पालख्या मार्गस्थ झाल्यानंतर नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून पालखी मार्ग स्वच्छ केला. 

दर्शनासाठी दौंडमध्ये आलेल्या पालख्या 
दौंड तालुका - कुरकुंभ (श्री फिरंगाई माता), गिरीम (श्री भैरवनाथ), गोपाळवाडी (श्रीनाथ म्हस्कोबा), जिरेगाव (श्री भैरवनाथ), मळद (श्री भैरवनाथ), माळवाडी (श्री म्हसोबा), मसनेरवाडी (श्री म्हस्कोबानाथ), येडेवाडी (श्री बिरोबा), खोरवडी (श्री तुळजा भवानीमाता), पांढरेवाडी (श्री काळभैरवनाथ), मेरगळवाडी (श्री भैरवनाथ), भोळोबावाडी (श्री भोळोबा) व कौठडी (श्री भैरवनाथ).बारामती तालुका - शिर्सुफळ (श्री शिरसाईमाता).

Web Title: Occasion of Ashadhi Ekadashi in Daund district