
Sharad Pawar : ओडिशातील रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी
पुणे - लालबहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी दुसऱ्यांदा झालेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. परंतु देशातील आजची परिस्थिती वेगळी असून, राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वाटेल ते करावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुण्यात शनिवारी आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
पवार म्हणाले, ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी झाली पाहिजे. तशी मागणी सर्व राजकीय पक्षांनीही केली आहे. चौकशीनंतर अपघाताचे सत्य समोर येईल.
दिल्लीत सुरू असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, महिला कुस्तीपटूंच्या आरोपांची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणाची चौकशी करून महिला कुस्तीपटूंना न्याय द्यावा. नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामध्ये झालेल्या दलित युवकाच्या हत्येच्या प्रश्नाबाबत पवार म्हणाले, नांदेड येथील घटनेविषयी माहिती नाही. जर असे काही घडले असेल, ही घटना निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही.
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेबाबत विचारले असता, पवार म्हणाले, देशासमोर आणि राज्यासमोर इतर अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही.