चहाची गाडी आणि हॉटेलमध्ये पैशांची देवघेव

Bribe
Bribe

पुणे - शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कामांसाठी होणारी आर्थिक देवघेव रोज चहाच्या टपरीवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील हॉटेलांमध्ये चालते, असे लाच प्रकरणातील एफआयआरवरून स्पष्ट होत आहे.

याशिवाय हा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ‘टोळ्या’ कार्यालयीन वेळेनंतर रात्री कार्यालयात बसून हे व्यवहार करतात, असेही बोलले जात आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून पुण्यातील कार्यालयात ठाण मांडून असलेल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.

उपसंचालक कार्यालयात शुक्रवारी लाच प्रकरण घडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिपायाने कुणासाठी पैशांची मागणी केली, याची कबुली दिली आहे. पैसे कुठे घेतले याचाही उल्लेख त्यात असल्याने चहाची गाडी आणि हॉटेलात हे व्यवहार चालतात, याला पुष्टी मिळाली आहे. यातील एक अधिकारी आणि सहायक शिक्षण उपनिरीक्षक यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण खात्याला सविस्तर अहवाल पाठविणार असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले होते. हा अहवाल तयार करण्यात येत असून, तो शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेड आक्रमक
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, चंद्रशेखर घाडगे, महादेव मातेरे, अक्षय गायकवाड, शिवाजी पवार, जयदीप रणदिवे यांनी या संदर्भात आज शिक्षण आयुक्त कार्यालयातील उपसंचालक अनुराधा ओक, प्रशासन अधिकारी श्रीधर शिंत्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. उपसंचालक कार्यालयात अधिकारी, कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. कोणतीही कामे विहीत वेळेत केली जात नाहीत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हप्तेखोर टोळी निर्माण झाली असून, त्यांची मनमानी सुरू आहे. प्रत्येक कामासाठी पैसे मागितले जातात. त्यामुळे ज्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर लगेच बदली करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. 

बदली आणि विभागीय चौकशी
उपसंचालक कार्यालयातील लाचप्रकरणी, तसेच तेथील अनागोंदी व्यवहारांबाबत शिक्षण आयुक्त कार्यालय कोणती कारवाई करणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणांशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची बदली आणि विभागीय चौकशीची शिफारस शिक्षण सचिवांना केली जाणार असल्याचे या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com