औषध खरेदीत अधिकारी, कर्मचारी दोषी

Pune-Zp
Pune-Zp

पुणे - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यासाठी खरेदी केलेल्या गोळ्या- औषधांची कागदोपत्री खरेदी आणि प्रत्यक्षात साठा याचा ताळमेळच लागत नाही, त्यामुळे यामध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आरोग्य खात्यातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी दोषी असल्याचे आढळून आल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले. त्यानुसार याप्रकरणी दोषी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिला आहे. 

गोळ्या- औषधांची खरेदी किती झाली, प्राथमिक आरोग्य केंद्रांना किती पुरवठा करण्यात आला आणि आरोग्य विभागाकडे शिल्लक राहिलेल्या औषधांचे काय, आदी प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. याउलट याबाबतची कोट्यवधी रुपयांची देयके मात्र मंजूर करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार या चौकशीतून उघडकीस आला असल्याचे या चौकशी समितीचे अध्यक्ष आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे यांनी भर सभागृहात सांगितले. 

भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी आरोग्य विभागातील औषध गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊनही अहवाल सादर का केला नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत, या संदर्भात जाब विचारला. त्यावर अध्यक्ष देवकाते यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल सभागृहाला वाचून दाखविण्याचा आदेश शेडगे यांना दिला. शेडगे यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समितीने ही चौकशी केली आहे. 

औषधे खरेदीत नियमितता नाही. औषध साठ्याच्या ठिकाणी दोन नोंदवह्या असून, त्यांचे संगणकीकरण झालेले नाही. काही कागदांवर आरोग्य अधिकाऱ्यांच्या सह्या असून, काहींवर सह्याही नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात खरेदी केलेल्या औषधांपैकी किती औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आली, हेही स्पष्ट होत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. 

सर्वसाधारण सभेतील विविध विषयांवरील चर्चेत शरद लेंडे, पांडुरंग पवार, आशा बुचके, वीरधवल जगदाळे, रणजित शिवतरे, दत्तात्रेय झुरंगे, अमोल नलावडे, विठ्ठल आवाळे, दिनकर धरपाळे, देवराम लांडे, देविदास दरेकर, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, अतुल देशमुख, बाबा काळे, जयश्री पोकळे, दिलीप यादव, शलाका कोंडे, वैशाली पाटील, सागर काटकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला. या सभेत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार व संजय जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com