दौंड तालुक्यात अधिकारी राष्ट्रवादीला बदनाम करतायेत; वैशाली नागवडे यांचा आरोप 

प्रफुल्ल भंडारी 
Sunday, 20 September 2020

दौंड शहरातील पत्रकार परिषदेत वैशाली नागवडे यांनी हा आरोप केला.

दौंड (पुणे) : "तालुक्यात निगेटिव्ह रूग्णांना पॅाझिटिव्ह दाखवून त्यांच्यावर खासगी रूग्णालयांमध्ये उपचार केला जात आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे. शासकीय यंत्रणा कोरोनाबाधितांना योग्य उपचार आणि शासनाच्या योजनांचा लाभ न देता राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाला बदनाम करीत आहे," असा गंभीर आरोप पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौंड शहरातील पत्रकार परिषदेत वैशाली नागवडे यांनी हा आरोप केला. तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाही प्रशासनाने वेळीच खासगी रूग्णालये अधिग्रहित केली नाहीत. वेळेवर उपाययोजना न झाल्याने बाधितांचा आकडा वाढत आहे. रूग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ न देता त्यांच्याकडून वारेमाप पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांच्याकडून आवश्यक कारवाई झालेली नाही. 

अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने रूग्णांच्या जीवाशी खेळण्याबरोबर त्यांची लूट केली जात आहे. खासगी रूग्णालयांकडून बाधितांना आगाऊ रकमेची पावती, औषधांची यादी आणि केलेल्या उपचारांची माहिती दिली जात नाही. रूग्णांना लुबाडणाऱ्यांची माहिती असतानाही वेळीच कारवाई न करता प्रांताधिकाऱ्यांपासून आरोग्य व महसूल यंत्रणेतील काही अधिकारी संगनमताने पक्षाला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदार सुप्रिया सुळे या पक्ष पदाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्याशी ऑनलाइन संवाद साधून स्थितीचा आढावा घेत आहेत. एकीकडे शासन आवश्यक निधी आणि यंत्रणेसह उपकरणे देण्यासाठी सर्व प्रयत्न करीत असताना दौंड तालुक्यात मात्र, शासकीय यंत्रणा नागरिकांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवून शासनाविषयी नाराजी वाढविण्याचे काम करीत आहे, असे नागवडे म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: officers defaming to ncp in daund, allegation of vaishali nagwade