तळमाचीवाडीच्या भूस्खलनाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी; 'सकाळ'च्या बातमीची दखल

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी गुरुवारी रात्री मंडल अधिकारी डी.पी.माळी, तलाठी सुरेंद्र जाधव यांना तळमाची येथे माहिती घेण्यासाठी पाठविले. यावेळी ग्रामस्थांशी मोबाईलवरून त्यांनी चर्चा केली तसेच तात्पुरते स्थलांतर करू इच्छित असाल तर आवश्यक सर्व मदत केली जाईल असे सांगितले.

जुन्नर - सततच्या पावसामुळे तळमाचीवाडी ता.जुन्नर येथील दौडया डोंगराच्या उतारावरील खासगी जमिनीत भेगा पडल्या असून काही ठिकाणी भुस्खलन झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील यांनी दिली.

याबाबतच्या ई सकाळ व सकाळमधील वृत्ताची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी गुरुवारी रात्री मंडल अधिकारी डी.पी.माळी, तलाठी सुरेंद्र जाधव यांना तळमाची येथे माहिती घेण्यासाठी पाठविले. यावेळी ग्रामस्थांशी मोबाईलवरून त्यांनी चर्चा केली तसेच तात्पुरते स्थलांतर करू इच्छित असाल तर आवश्यक सर्व मदत केली जाईल असे सांगितले. उपविभागीय अभियंता पाटील यांनी आज शुक्रवारी ता.24 रोजी सकाळी तर तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांयकाळी येथे भेट दिली. ग्रामस्थ बाळू तुकाराम साबळे यांनी गावापासून पश्चिमेला सुमारे तीनशे मीटर अंतरावर भेगा पडल्याचे तसेच डोंगरावरून वाहत येणाऱ्या दोन ओढ्याच्या मधील काही भूभाग कमरेइतका खचला असल्याचे सांगितले होते.

पाटील म्हणाले, सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरून ती भुसभुशीत झाली आहे. यामुळे खडकावर असलेला मातीचा थर सरकला आहे झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या तर जमिनीला भेगा पडून त्यातून पाणी वाहत आहे. हा भाग वस्तीपासून दूर आहे सद्यातरी धोक्याची शक्यता कमी आहे. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. पुनर्वसनाचे काम आमच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.

येथील पुनर्वसन रखडले आहे तर दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या कमी अधिक भेगा व जमीन खचण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. घरांना ओली येऊ लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूजल सर्वेक्षण विभागाचा भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचा अहवाल आहे तर दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या गावात तळमाचीवाडीचा समावेश आहे. येथील ग्रामस्थ गेली तेरा वर्षे पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहत आहेत मात्र पुनर्वसनाचा प्रश्न काही सुटत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र दरड कोसळण्याचा धोका नसल्याचा अभिप्राय दिला असल्याने गावास निधी मिळाला नसल्याचे सांगण्यात येते.पुनर्वसनाचे काम रखडले आहे.अशा काही घटना घडल्यानंतर अधिकारी गावाला भेट देतात आपला अहवाल शासन दरबारी पाठवून देतात. प्रश्न मात्र तसाच कायम राहत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
 

Web Title: officials surveyed of landslide at talmachi vadi taluka junnar