इंदापूर तालुक्यात १९ हजार ३४१ अर्ज बाद

डॉ. संदेश शहा
बुधवार, 20 जून 2018

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली आहे. मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात सावळागोंधळ सुरू आहे. कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र वेळोवेळी विविध घोषणा झाल्यामुळे आजसुद्धा कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. याबाबतचा तालुकानिहाय घेतलेला आढावा ‘ऑफलाइन कर्जमाफी’ आजपासून....

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली आहे. मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात सावळागोंधळ सुरू आहे. कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र वेळोवेळी विविध घोषणा झाल्यामुळे आजसुद्धा कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. याबाबतचा तालुकानिहाय घेतलेला आढावा ‘ऑफलाइन कर्जमाफी’ आजपासून....

इंदापूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून इंदापूर तालुक्‍यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, हा संशोधनाचा विषय आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या इंदापूर तालुका शाखेतून एकूण ७ हजार ३५४ सभासदांची ५४ कोटी १५ लाख ८१ हजार २६८ रुपयांची कर्जमाफी झाली; तर ७ हजार २५६ सभासदांनी संपूर्ण कर्ज परतफेड केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफी म्हणून १४ कोटी ९२ लाख ९२ हजार ६६७ रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. कर्जाची एकरकमी परतफेड केलेल्या सभासदांना ८१ कोटी १७ लाख ८४ हजार रुपयांची माफी देण्यात आली आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील १७ बॅंकांनी २९ हजार ३३२ शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले. त्यातील केवळ १० हजार ३७३ अर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरले; तर १९ हजार ३४१ अर्ज विविध निकषांमुळे बाद ठरले. त्यातील ३८३ प्रलंबित अर्जापैकी केवळ १ अर्ज सध्या प्रलंबित आहे. 

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बॅंक वगळता इतर बॅंकांतून शेतकऱ्यांना किती रुपयांची कर्जमाफी मिळाली, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नाही. सरकारने दिलेली कर्जमाफीची पूर्ण रक्कम अद्याप बॅंकांकडे वर्ग न झाल्याने सोसायटी व बॅंकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. काही सोसायट्यांच्या अडचणीत मात्र थकबाकी वसुली होत नसल्याने अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, मात्र त्यांनी दीड लाखाची कर्जमाफीची रक्कम भरली नाही, त्यांचे कर्ज पुनर्गठन होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक सालचंदी धोक्‍यात आली आहे. 

तालुक्‍यातील विविध बॅंकांच्या कर्जमाफीची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक : २१ हजार ९०९ अर्जांपैकी ८०१३ पात्र; तर १३ हजार ९६० अपात्र. फेडरल बॅंक - ४ अर्जांपैकी ३ पात्र; तर १ अपात्र. एच.डी.एफ.सी. बॅंक - २०१ अर्जांपैकी ३२ पात्र; तर १६९ अपात्र. महाराष्ट्र ग्रामीण बॅंक - चारीही अर्ज अपात्र. इंडियन ओव्हरसीज बॅंक - १६६ अर्जांतून २८ अर्ज पात्र; तर १३८ अर्ज अपात्र. कॅनरा बॅंक - ४७ अर्जांपैकी १५ पात्र; तर ३२ अर्ज अपात्र. आय.डी.बी.आय. बॅंक - २६३ अर्जांपैकी ५० अर्ज पात्र; तर २१३ अर्ज अपात्र. युनियन बॅंक ऑफ इंडिया - ५० अर्जांपैकी फक्त १ अर्ज पात्र; तर ४९ अर्ज अपात्र. कॉर्पोरेशन बॅंक - १०५ अर्जांपैकी २४ अर्ज पात्र; तर ८१ अर्ज अपात्र. बॅंक ऑफ इंडिया - ३६३ अर्जांपैकी ७८ पात्र; तर २८५ अपात्र. देना बॅंक - ९३० अर्जांपैकी ४९२ पात्र; तर ४३८ अपात्र. बॅंक ऑफ बडोदा - २५१ अर्जांपैकी ७७ पात्र; तर १७४ अपात्र. स्टेट बॅंक ऑफ इंडिया - १०९९ अर्जांपैकी ३८७ पात्र; तर ७१२ अपात्र. बॅंक ऑफ महाराष्ट्र - २ हजार ९९५ अर्जांपैकी ८४२ पात्र; तर २१८३ अपात्र. ॲक्‍सिस बॅंक - ५६२ अर्जांपैकी २९९ पात्र; तर २६३ अपात्र. इंडियन बॅंक - ७५ अर्जांपैकी ३३ पात्र; तर ४२ अपात्र. आय.सी.आय.सी.आय. बॅंक - ६७५ अर्जांपैकी केवळ १ पात्र; तर ६७४ अपात्र ठरले.

Web Title: Offline debt waiver form farmer