आंबेगावात २१ हजार ६९० अर्ज नामंजूर

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 22 जून 2018

मंचर - आंबेगाव तालुक्‍यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना २०१७ कर्जमाफी मिळण्यासाठी ३८ हजार ७९८ शेतकऱ्यांनी सरकारकडे अर्ज केले होते. त्यापैकी २१ हजार ६९० अर्ज नामंजूर झाले असून, १४ हजार ५२७ जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत. दोन हजार ५८१ जणांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. 

मंचर - आंबेगाव तालुक्‍यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना २०१७ कर्जमाफी मिळण्यासाठी ३८ हजार ७९८ शेतकऱ्यांनी सरकारकडे अर्ज केले होते. त्यापैकी २१ हजार ६९० अर्ज नामंजूर झाले असून, १४ हजार ५२७ जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत. दोन हजार ५८१ जणांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. 

कर्जमाफी होईल, या अपेक्षेने ३१ जुलै २०१७ रोजी शेतकऱ्यांनी कर्जाच्या रकमेचा भरणा केलेला नाही. त्यामुळे ५९ विविध कार्यकारी सोसायट्या ‘एनपीए’मध्ये गेल्या आहेत. त्यातून सोसायट्यांचा नफा कमी झाला असून, नवीन कर्ज सभासदांना वितरण त्यांना करता आले नाही. त्याचा फटका सुमारे १२ हजार ५०० शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचा परिणाम शेत मशागतीच्या कामावर होणार आहे. नवीन कर्ज मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा खासगी सावकरांकडे धाव घेतल्याची चर्चा सुरू आहे.

आंबेगाव तालुक्‍यात विविध कार्यकारी सोसायट्यांची संख्या ५९ आहे. शेतकरी सभासद संख्या २८ हजार आहे. दर वर्षी खरीप व रब्बी हंगामात येथील शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांपर्यंत पीककर्ज पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून वितरित केले जात असते. 

मार्च व जूनअखेर कर्जाची परतफेड शेतकरी करतात. कळंब, महाळुंगे पडवळ, निरगुडसर, काठापूर, भराडी, नागापूर, रांजणी, वळती, कुरवंडी, नांदूर, चांडोली बुद्रुक आदी सोसायट्यांमार्फत दर वर्षी १०० टक्के कर्जवसुली केली जाते. उर्वरित सोसायट्यांचेही कर्जवसुलीचे प्रमाण सरासरी ८५ टक्के आहे. परंतु, कर्जमाफीचा लाभ मिळणार, या अपेक्षेने गेल्या वर्षी जून व मार्चमध्ये अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही.

पुणे जिल्हा बॅंकेमार्फत सात कोटी ९२ लाख चौदा हजार रुपये कर्जमाफीची रक्कम मिळालेली आहे. त्याचा फायदा एक हजार ७५४ शेतकऱ्यांना झालेला आहे. तसेच, सन २०१५-१६ व १६-१७ अशी सलग दोन वर्षे कर्जफेड वेळेत केलेल्या १२ हजार ३९६ सभासदांना प्रोत्साहनपर १८ कोटी २४ लाख ७२ हजार रुपये कर्जमाफीचा फायदा मिळाला आहे. जिल्हा बॅंकेमार्फत एकूण चौदा हजार १५० शेतकऱ्यांना २६ कोटी १६ लाख ८६ हजार रुपये कर्जमाफीचा फायदा मिळाला आहे.    

कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली. पण, कर्जमाफीचाही फायदा होण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात कर्जमाफी योजनेविषयी प्रचंड नाराजी आहे. अनेक जाचक नियम व अटी घातल्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर राहिला आहे. ही फसवी योजना आहे. किचकट अटी असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.
 - प्रभाकर बांगर 

(उद्याच्या अंकात - जुन्नर तालुका)

Web Title: Offline debt waiver form farmer