जुन्या दुचाकीधारकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - जुन्या दुचाकींना ‘अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टीम’ बसविण्यासाठी केंद्र सरकारने एक वर्षाची मुदत दिली आहे. दरम्यानच्या काळात नवीन ब्रेक प्रणाली बसविण्याचे निकष व वितरक निश्‍चित होणार आहेत. मात्र, एक एप्रिलनंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांत नवी ब्रेक प्रणाली असेल. 

पुणे - जुन्या दुचाकींना ‘अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टीम’ बसविण्यासाठी केंद्र सरकारने एक वर्षाची मुदत दिली आहे. दरम्यानच्या काळात नवीन ब्रेक प्रणाली बसविण्याचे निकष व वितरक निश्‍चित होणार आहेत. मात्र, एक एप्रिलनंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांत नवी ब्रेक प्रणाली असेल. 

सर्व दुचाकी वाहनांना ‘अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टीम’ बसविण्याची सक्ती केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केली. मात्र, त्यात आता बदल करण्यात आला आहे. एक एप्रिल २०१८ नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांत नवी ब्रेक प्रणाली बसविण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत, तर जुन्या दुचाकींना १ एप्रिल २०१९ पासून सक्ती होईल, असे केंद्राने म्हटल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. नव्या ब्रेक प्रणालीमुळे दुचाकी घसरणार नाही. दोन्ही चाकांना एकदम ब्रेक लागणार आहे. त्यामुळे दुचाकींचे अपघात मोठ्या संख्येने कमी होतील, असा केंद्र सरकारचा होरा आहे. त्यामुळे नवी ब्रेक प्रणाली बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

ही ब्रेक प्रणाली संबंधित दुचाकी कंपन्यांचे वितरक बसवून देणार का, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमणार, ब्रेक प्रणालीसाठी दुचाकीचालकांना किती खर्च येईल, त्यासासाठी वाहनात तांत्रिक बदल काय करावे लागतील, या बाबतचे निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नवी ब्रेक प्रणाली बसविण्यापासून दुचाकीचालकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. 

मोटारीत एअर बॅग सक्तीची 
केंद्र सरकारच्या नव्या निकषांनुसार प्रत्येक मोटारीत चालकासाठी एअर बॅग्ज आवश्‍यक असतील. त्यासाठी मोटार उत्पादक कंपन्यांशी केंद्र सरकारची चर्चा सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. जुन्या मोटारींमध्ये एअर बॅग्ज कशा बसवायच्या, याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे समजते. याबाबतचे धोरण येत्या काही दिवसांत जाहीर होईल, असा अंदाज वाहन उद्योग क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: old bikes in pune