पुण्यात 'पीएमपी'च्या गाड्यांना चढवेना कात्रजचा घाट!

पुण्यात 'पीएमपी'च्या गाड्यांना चढवेना कात्रजचा घाट!

खेड-शिवापूर (पुणे) : स्वारगेट ते कोंढणपूर या मार्गावरील 'पीएमपी'च्या बस कात्रज घाटात बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार होत असलेल्या या प्रकाराने विद्यार्थी आणि कामगार वर्ग त्रस्त झाला आहे. या मार्गावर जुन्या आणि नादुरुस्त बस सोडण्यात येत असल्याने बस बंद पडत असून या मार्गावर नवीन बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

स्वारगेट ते कोंढणपूर या मार्गावर 'पीएमपी'ची बससेवा सुरु आहे. या मार्गावरून खेड-शिवापूर, कुसगाव, आर्वी, कोंढणपूर, कल्याण, अवसरवाडी, रहाटवडे या गावात बससेवा सुरु आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि कामगार शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्याला जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गावरील 'पीएमपी'चे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

या मार्गावर बसची वारंवारता कमी आहे. त्यामुळे बस मध्ये प्रवाशांची संख्या नेहमी जास्त असते. त्यातच कात्रज घाटात बस बंद पडण्याचे प्रमाण जास्त आहे. बस बंद पडल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसची वाट पाहत थांबावे लागते. पाठीमागून येणारी बसही गर्दीने भरलेली असते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यांना महाविद्यालयात तसेच नोकरीवर वेळेत पोचता येत नाही. अनेक प्रवाशांना बसचा पास असूनही या प्रकारामुळे खासगी वाहनांनी प्रवास करुन आर्थिक भुर्दण्ड सहन करावा लागतो.

या मार्गावर कायमच जुन्या आणि नादुरुस्त बस सोडण्यात येतात. त्यामुळे कात्रज घाट रस्त्याचा चढ अनेक बसना चढ़ता येत नाही. त्या बस रस्त्यातच बंद पडतात. बस बंद पडण्याचे प्रमाणही जास्त आहे. या मार्गावर नवीन आणि दुरुस्त बस सोडल्यास बस बंद पडणार नाहीत, असे मत या मार्गावरील प्रवासी व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com