पोलिसांतील माणुसकीने ज्येष्ठावर उपचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सुपे - रात्रीचे काम संपून सकाळी सहायक फौजदार घरी जाण्यासाठी निघाले तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रहदारीच्या रस्त्यावर अनोळखी ज्येष्ठ व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या ज्येष्ठ व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन या ज्येष्ठाला कुटुंबाच्या स्वाधीन केले. 

सुपे - रात्रीचे काम संपून सकाळी सहायक फौजदार घरी जाण्यासाठी निघाले तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रहदारीच्या रस्त्यावर अनोळखी ज्येष्ठ व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या ज्येष्ठ व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन या ज्येष्ठाला कुटुंबाच्या स्वाधीन केले. 

बारामती तालुक्‍यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत मोरगाव पोलिस चौकीत सहायक फौजदार पी. एन. जगताप, तर सुपे चौकीत होमगार्ड जवान महेंद्र शिवतारे कार्यरत आहेत. गेल्या रविवारी (ता. ५) जगताप रात्रीची गस्त संपून सकाळी घरी जाण्याच्या तयारीत असताना मोरगाव-जोगवडी रस्त्यावर ज्येष्ठ पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून सुप्याच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने ती व्यक्ती शुद्धीवर आली; पण उपासमारीमुळे त्यांना बोलण्याचे त्राण उरले नव्हते. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप झेंडे, डॉ. हीना पाटील, डॉ. सायली शेळके यांनी तातडीने उपचार केले. जवान शिवतारे यांनी स्वतःच्या घरचा डबा आणून त्या आजोबांना भरवला. अथक प्रयत्नानंतर दोन दिवसांनी आजोबा बोलू लागले, पण ते पूर्ण शुद्धीवर नसल्याने नागपूर, सोलापूर असे कोणत्याही शहराचे नाव सांगायचे. सुमारे शंभरहून जास्त फोन शिवतारे यांनी केले. पण ठावठिकाणा लागेना. शिवाजीनगर असे अनेकदा नाव सांगताच पुण्यातील शिवाजीनगरला संपर्क साधून नातेवाइकांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना ही ज्येष्ठ व्यक्ती सांगवीची राहणारी असून, शुक्रवारी (ता. ३) दुपारपासून हरवल्याचे समजले. 

प्रभाकर शंकरराव देवळालीकर (वय ६५) असे या ज्येष्ठाचे नाव आहे. त्यांच्या नातेवाइकांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, सापडत नसल्याने अखेर हरवल्याची फिर्याद दिली. गुरुवारी (ता. ८) सकाळी देवळालीकर यांचा मुलगा हृषीकेश, पत्नी विद्या सुप्याच्या रुग्णालयात आले. कुटुंबीयांना पाहून बाबांनी अक्षरशः हंबरडा फोडला. माझं संपलं, आता कसलं घर, पण जगताप आणि शिवतारे यांच्यामुळे मला पुन्हा कुटुंब मिळालं. हे संभाषण ऐकताना जगताप व शिवतारे यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. वर्दीतल्या माणसाने चाकोरीबाहेर जाऊन दाखवलेल्या माणुसकीमुळे रुग्णालयातील सर्वांनाच गहिवरून आले. सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी जगताप, शिवतारे यांच्या या कामाचे कौतुक केले.

Web Title: old man treatment by police humanity