जुने नकाशे मिनिटभरात

योगिराज प्रभुणे  - @yogirajprabhune
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुणे - तुम्हाला आवश्‍यक असलेला एखादा शासन निर्णय (जीआर), वेगवेगळ्या विभागाचे तालुकास्तरापासून ते राज्यापर्यंतचे सर्व उपलब्ध नकाशे अवघ्या मिनिटभरात येथे पाहायला मिळणार आहेत. विश्‍वकोशातील संदर्भ आणि महाराष्ट्र सरकारचा अहवाल आदी सर्व उपलब्ध होणार आहे. कारण, पुण्यातील शासकीय ग्रंथागाराला आता ‘कार्पोरेट लुक’ दिला जातोय. ग्रंथागारांचा ‘मेक ओव्हर’ करण्याचा हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.

पुणे - तुम्हाला आवश्‍यक असलेला एखादा शासन निर्णय (जीआर), वेगवेगळ्या विभागाचे तालुकास्तरापासून ते राज्यापर्यंतचे सर्व उपलब्ध नकाशे अवघ्या मिनिटभरात येथे पाहायला मिळणार आहेत. विश्‍वकोशातील संदर्भ आणि महाराष्ट्र सरकारचा अहवाल आदी सर्व उपलब्ध होणार आहे. कारण, पुण्यातील शासकीय ग्रंथागाराला आता ‘कार्पोरेट लुक’ दिला जातोय. ग्रंथागारांचा ‘मेक ओव्हर’ करण्याचा हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.

ग्रंथागाराला ‘कार्पोरेट लुक’
अंधूक प्रकाश असणाऱ्या खोलीतील कप्प्यांमध्ये एकावर एक रचून ठेवली पुस्तके... शासन निर्णयाचे ढिगावर साचलेले धुळीचे थर... कोंदट वातावरण आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता असे दृश्‍य सरकारी ग्रंथालयात आपण सर्रास पाहिले आहे. ‘टिपिकल’ सरकारी प्रक्रियेमुळे पुस्तकप्रेमींचा येथे फारसा ओढा नाही. पण आता शहरातील अद्ययावत सेवासुविधांनी सुसज्ज पुस्तकालयांप्रमाणे या ग्रंथालयांना ‘कार्पोरेट लुक’ दिला जात आहे. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

आकर्षक मांडणी अन्‌ बसण्याची सोय
ग्रंथागारात पाय ठेवताच पुस्तक प्रेमींना प्रसन्न वाटेल, असे वातावरण येथे करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रकाशयोजना, पुस्तकांची मांडणी, बसण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि टापटीपपणा हे बदललेल्या चेहऱ्या- मोहऱ्याचे वैशिष्ट्य आहे. तासन्‌ तास बसून नागरिकांना पुस्तके चाळता यावीत, अशी व्यवस्था येथे केली आहे. त्यामुळे पुणेकर नागरिक या शासकीय ग्रंथालयाकडे आकर्षित होतील, असा विश्‍वास कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

राज्यात पहिला पथदर्शी प्रयोग
पुण्यासह मुंबई येथील चर्नी रोड, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे शासकीय ग्रंथागार आहेत. येथे महत्त्वाची पुस्तके आहेत; पण ती लोकांपर्यंत पोचत नाहीत. सरकारी ग्रंथालयांमधील पुस्तकांची माहिती लोकांना झाली पाहिजे. त्यासाठी नागरिकांना आकर्षित करणे आवश्‍यक असून ‘मेक ओव्हर’चा राज्यातील पहिला प्रयोग पुण्यात सुरू आहे.

सरकारी ग्रंथागारातील साहित्य खजिना
सरकारने मुद्रित आणि प्रकाशित केलेली असंख्य पुस्तके येथे अत्यंत माफक दरात विक्रीसाठी ठेवली आहेत. भारतीय राज्यघटनेची प्रत, त्याच बरोबर महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि साहित्याची माहिती देणारी असंख्य पुस्तके मांडण्यात आली आहेत. साहित्य संस्कृती मंडळाची पुस्तके, विश्वकोश, भाषा शब्दकोश याची स्वतंत्र दालने तयार केली आहेत.

समाजसुधारकांचे जीवनपट उलगडणाऱ्या कादंबऱ्याही येथे आहेत. महाराष्ट्र शासन राजपत्र, अधिनियम, नियम, अहवाल, नकाशे आदी बाबी वाचकांच्या सहज नजरेत पडतील, अशी नवी रचना केली आहे. हे सर्व साहित्य कोणालाही क्षणात उपलब्ध होणार आहे.

ग्रंथागाराची उपयुक्तता
नव्या रचनेत लोकांसमोर येत असलेल्या या शासकीय ग्रंथालयात सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आहे. सामान्य नागरिकांना सरकारी योजनांची माहिती येथे मिळेल. जनगणना, अद्ययावत सरकारी आदेश याचे इत्थंभूत संकलन येथे असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय माहितीचा मोठा स्रोत आहे. तसेच, अभ्यासक, विद्यार्थी आणि सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यक संदर्भ येथे निश्‍चित मिळतील. 

नागरिकांनी सरकारी ग्रंथागारांना नियमित भेट द्यावी आणि तेथील पुस्तके चाळावीत, यासाठी सरकारी ग्रंथागाराची संपूर्ण रचना बदलली जात आहे. या ग्रंथागाराला पुणेकरांची निश्‍चित पसंती मिळेल, असा विश्‍वास वाटतो.
- नरेश गोटे, व्यवस्थापक, शासकीय ग्रंथागार

Web Title: old map immediate