ओला-उबरचा ‘अघोषित बहिष्कार’

Ola
Ola

पुणे - प्रवेशासाठी पन्नास रुपये आणि तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास ३५४ रुपये आकारण्याच्या भीतीमुळे बहुसंख्य ओला- उबरचालकांसह व्यावसायिक प्रवासी वाहतूकदारांनी विमानतळाच्या बाहेरच प्रवासी सोडण्यास सुरवात केली आहे. या ‘अघोषित बहिष्कारा’मुळे संबंधित चालकांचे आणि प्रवाशांचे वाद होत असल्याचे चित्र दिसत आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गेल्या ५ मार्चपासून नव्या पार्किंग धोरणाची (पॉलिसी) अंमलबजावणी लोहगाव विमानतळावर सुरू केली आहे. त्यानुसार व्यावसायिक वाहनांना विमानतळाच्या आवारात प्रवेश करताना ५० रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यात प्रामुख्याने ओला- उबर तसेच अन्य व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास त्यांच्याकडून ३५४ रुपये आकारले जातात. त्यामुळे ओला, उबरचालक प्रवाशांना विमानतळाच्या प्रवेशद्वाराबाहेर सोडत आहेत. परिणामी, प्रवाशांना बॅगा उचलून प्रवेशद्वारापर्यंत जावे लागत असल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत. 

याबाबत विमानतळ प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्यांनी प्राधिकरणाच्या आदेशाकडे बोट दाखविले. त्यातच पूर्वी विमानतळाच्या आवारात असलेले ओला- उबरचे स्टॅंड आता क्रमांक दोनच्या वाहनतळावर हलविले आहेत. तेथून विमानतळपर्यंत पोचण्यासाठी व्हिलचेअरचीही सुविधा नाही. त्यामुळे अपंग व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.

निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी  
याबाबत हवाई वाहतूक विश्‍लेषकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला नुकतेच पत्र पाठवून तीन मिनिटांच्या  शुल्काबाबत नापसंती व्यक्त केली आहे. ५० रुपये प्रवेश शुल्क आणि तीन मिनिटांच्या दंडाचे ३५४ रुपये, ही रक्कम अवाजवी आहे. त्यामुळे या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मी कुटुंबासह रविवारी पहाटे लोहगाव विमानतळावर उतरलो. बॅगाही बऱ्याच होत्या; परंतु प्रवेशद्वारापर्यंतच ट्रॉली नेण्याची परवानगी होती. तेथे ती सोडावी लागली. त्यानंतर बॅग उचलून वाहनांच्या गर्दीतून मी कॅब स्टॅंडपर्यंत पोचलो. विमानतळ प्रशासनाच्या या गैरकारभाराबद्दल मी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. 
- डॉ. राजेश मेहता, प्रवासी 

ओला- उबरसाठी प्रवेश शुल्क आणि तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कमही अवाजवी आहे. ती प्रवाशांकडून घेता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना चालक प्रवेशद्वाराच्या बाहेरच सोडत आहे. याबाबत आम्ही विमानतळ प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे. 
- गणेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com