जाणून घेऊया जुन्या वाड्यांचा वारसा (व्हिडिओ)

नीला शर्मा 
बुधवार, 12 जून 2019

जुन्या वाड्यांमधलं ते वेगळंच वातावरण. काही वाड्यांमधले जिने लाकडी तर काहींचे दगडी. काही खोल्या आणि जिन्यांमध्ये भरदुपारीही खूप अंधार. गूढ, रहस्यमय चित्रपट किंवा मालिका पाहत असल्यासारखं. 

पुणे - जुन्या वाड्यांमधलं ते वेगळंच वातावरण. काही वाड्यांमधले जिने लाकडी तर काहींचे दगडी. काही खोल्या आणि जिन्यांमध्ये भरदुपारीही खूप अंधार. गूढ, रहस्यमय चित्रपट किंवा मालिका पाहत असल्यासारखं. 

बाजीराव रस्त्यावरील विश्रामबाग वाड्याच्या मागच्या कानिटकर वाड्यातलं तुळशी वृंदावन,  उखळी, दोन भिंतींच्या  मधोमध सामानसुमान ठेवण्यासाठी बळद आदी पाहताना आपण एकविसाव्या शतकात आहोत याचा विसर पडतो. तिथले आजोबा भास्कर बालकृष्ण कानिटकर म्हणाले, " आमचा वाडा  आठ पिढ्या जुना आहे. पावणेदोनशे वर्षं जुन्या  आमच्या वाड्यात पाहुणी म्हणून येणारी मुलं खूप रमतात." 

कसबा पेठेतील निजामपूरकर वाड्याचा बाहेरचा भाग आपल्या वेगळ्या रचनेमुळे आपल्याला खुणावते. सागवानी लाकडाच्या दरवाज्यांचं रूप निराळंच आहे. आत गेल्यावर अरुंद जिन्यानं वर गेल्यावर एका खोलीत भातुकलीती भरपूर छोटी भांडी मांडलेली आहेत. मागची खोली ओलांडून मोकळ्या जागेत कुरडया, सांडगे वगैरे वाळवण दिसलं. एका बाजूला मनीमाऊची सहा पिल्लं. खाली उतरून आल्यावर मागच्या अंगणात अठराशे पासष्ठ सालची नोंद असलेल्या पिंपानं लक्ष वेधून घेतलं. 

थोड्या अंतरावर ठाकरवाड्यात दोरीला लटकवलेले कांद्याचे गुच्छ दिसले. "ते उरळी कांचनमधल्या आमच्या शेतातले आहेत," असं वाड्याचे मालक ठाकर यांनी सांगितलं. तिथं  गाय आणि तिची कालवडसुद्धा होती. तिथून चार - पाच वाडे पलिकडे सोनावणेंच्या वाड्यात एका खोलीतून दुसर्‍या, तिसऱ्या, चौथ्या खोलीत जाता येईल अशी रेल्वेच्या डब्यांसारखी गंमत होती. शेजारच्या कर्डे वाड्याचा निळ्या रंगाचा मजबूत दरवाजा पाहिल्यावर किल्ल्याची दारं अशीच, पण खूप मोठी असतात हे जाणवलं. 

खास मराठमोळी संस्कृती जपणारे बरेचसे वाडे 
अजूनही मागच्या पिढ्यांचा वारसा जपत उभे आहेत. या वाड्यांमध्ये सध्या असणाऱ्या पिढ्या नव्या वस्तू, नवे विचार घेऊन जगतात. पण तिथल्या भिंती, दरवाजे, खिडक्या, कोनाडे वगैरेंमधून त्यांच्या पाच-सहा पिढ्यांच्या आठवणी सांभाळल्या गेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old wada in Pune