कसरती करत बनली अनाथांची माय

संदीप जगदाळे 
शनिवार, 27 जुलै 2019

शांताबाई पवार यांचे वय ८५ वर्षे. त्या हडपसरमधील गोसावीवस्तीमध्ये राहतात. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर संकट कोसळले. मात्र खचून न जाता त्यांनी मोठ्या धैर्याने परिस्थितीशी दोन हात केले.

पुणे - शांताबाई पवार यांचे वय ८५ वर्षे. त्या हडपसरमधील गोसावीवस्तीमध्ये राहतात. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर संकट कोसळले. मात्र खचून न जाता त्यांनी मोठ्या धैर्याने परिस्थितीशी दोन हात केले.

सहा मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. यातूनच संसाराचा गाडा ओढण्यासाठी व चार पैशांसाठी त्यांनी जिद्दीने साहसी खेळातील कसरती सादर करायला सुरवात केली. या खेळातून मिळालेल्या पैशातून त्या संसाराचा गाडा या वयातही हाकत आहेत. तसेच दहा अनाथ मुलांची जबाबदारी त्या मोठ्या हिमतीने सांभाळत आहेत. त्यांचा खडतर जीवन 
प्रवास धडधाकट लोकांसाठीदेखील प्रेरणादायी आहे.

शांताबाई यांनी वयाच्या ९ व्या वर्षी विविध खेळ करायला सुरवात केली. या कलेचा वारसा लाभलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. लग्नानंतर त्यांचा हा खेळ सुटला. पुढे त्यांच्या पतीचे निधन झाले आणि पुन्हा त्यांनी डोंबारी खेळ सुरू केला. त्या जागोजागी साहसी खेळांची प्रात्यक्षिक सादर करून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवीत आहेत. 

तसेच या कलेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मुलांना स्वतःच्या पायांवर उभे केले. त्यांची नातवंडेदेखील त्यांना या खेळात मदत करत आहेत. उतारवयातदेखील त्या शहरात व विविध गावांत आपला खेळ सादर करत आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांतूनही आपली कला सादर केली आहे. 

शांताबाई  म्हणाल्या, कोणत्याही ठिकाणी  कला सादर करण्याची मी संधी साधते. भटक्‍या जमातींपैकी एक असलेल्या या समाजाची दखल शासनाने घ्यायला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old Women Shantabai Pawar acrobatics Life