
Solar Power Project : ‘ऑलिव्ह’च्या सौरऊर्जा प्रकल्पाची मोदींकडून दखल
आंबेगाव : वाढते वीजदर, दिवसेंदिवस निर्माण होत असलेल्या पर्यावरणीय समस्यांचा विचार करून आंबेगाव येथील दत्तनगरमधील ऑलिव्ह सोसायटीत शहरातील पहिला पायलट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. ‘मन की बात’ या कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोसायटीच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाची नुकतीच दखल घेऊन कौतुकाचा वर्षाव केला.
दक्षिण उपनगरांमधील सर्वोत्कृष्ट सोसायटीमध्ये ऑलिव्ह सोसायटीची गणना होते. सोसायटीची स्थापना २०१२ मध्ये झाली असून, २६८ सभासद असलेल्या या सोसायटीत २०१५ मध्ये सौर प्रकल्प बसविण्यात यावा, असा विचार पदाधिकाऱ्यांच्या मनात आला, परंतु त्यावेळी सोलर बसविणे खर्चिक बाब होत होती.
त्यानंतर सौर ऊर्जेचे धोरण जाहीर झाल्यानंतर त्यातील असणाऱ्या तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यात येऊन सोसायटीत अक्षय ऊर्जेचा प्रकल्प हा पर्यावरणपूरक होऊ शकतो, त्याचसोबत पैशांचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल, याचा विचार सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. त्यावर साधकबाधक चर्चा केल्यानंतर सौरऊर्जा पॅनल बसविण्याचा विचार पूर्णत्वाला गेला.
२०१६ मध्ये दिवंगत महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ५० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे, तर दुसऱ्या टप्प्यात ३० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पामुळे सोसायटीच्या आर्थिक खर्चात मोठी बचत झाली असून, दोन लाखांच्या आसपास येणारे बिल आता हजारांमध्ये येऊ लागले आहे. सोसायटीच्या आवारात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले असून, जैविक खत प्रकल्पाद्वारे कचऱ्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून टाकीमध्ये साठविले जाते.
सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र अकोलकर, उपाध्यक्ष दीपाली चाचड, सचिव विजय सूर्यवंशी, खजिनदार चंद्रकांत मांढरे, राजेंद्र मावळे, पराग शहा आदी पदाधिकारी कार्यकारणीचे काम पाहतात.
दृष्टिक्षेपात सोसायटी
सोसायटी स्थापना : २०११-१२
सोसायटीतील सदस्य : २६८
बसविण्यात आलेले एकूण सौरऊर्जा पॅनल : २६८
सौरऊर्जा प्रकल्पापूर्वीचे वीजबिल
(प्रति महिना ) : १ लाख ५० हजार ते १ लाख ८० हजार रुपये
सौरऊर्जा प्रकल्पानंतरचे
वीजबिल (प्रति महिना) : ५ हजार ते १० हजार रुपये
सोसायटीतील सौरऊर्जा प्रकल्पाची दखल पंतप्रधानांनी घेतली याचा आम्हाला रास्त अभिमान वाटतो. असा पर्यावरणपूरक सौर प्रकल्प प्रत्येक सोसायटीने उभारल्यास विजेसह पैशांचीही बचत होईल.
- रवींद्र अकोलकर, अध्यक्ष, ऑलिव्ह सोसायटी, दत्तनगर