13 वर्षीय ओमने तयार केली ई-सायकल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

वाकी (ता. खेड) येथील पायस मेमोरिअल स्कूलमधील ओम राहुल मिसाळ या आठवीतील विद्यार्थ्याने त्याच्या जुन्या मोडकळीस आलेल्या सायकलला जणू नवसंजीवनीच दिली आहे. 13 वर्षीय ओम याने स्वतः कमी खर्चात इलेक्‍ट्रिक सायकल तयार केली आहे. 

राजगुरुनगर : वाकी (ता. खेड) येथील पायस मेमोरिअल स्कूलमधील ओम राहुल मिसाळ या आठवीतील विद्यार्थ्याने त्याच्या जुन्या मोडकळीस आलेल्या सायकलला जणू नवसंजीवनीच दिली आहे. 13 वर्षीय ओम याने स्वतः कमी खर्चात इलेक्‍ट्रिक सायकल तयार केली आहे. 

ओमने इलेक्‍ट्रिक सायकल बनविण्यासाठीची आवश्‍यक माहिती इंटरनेट व पुस्तकांद्वारे मिळवून ई-सायकल तयार करण्याची किमया साधली आहे. त्यानंतर इलेक्‍ट्रिक मोटार त्याने शोधून काढली. ती मोटार चालू करण्यासाठी आणि सायकलला जोडण्यासाठीचे सर्व साहित्य त्याने स्वतः पुण्यात जाऊन विविध दुकानांतून शोधून आणले. त्यानंतर वायरिंग व सोल्डरिंग केले. जवळच्या वर्कशॉपमध्ये जाऊन इलेक्‍ट्रिक मोटार आणि बॅटरी बसविण्यासाठी लोखंडी स्टॅंड बनवून घेतले. त्यानंतर योग्य जोडणी करून इलेक्‍ट्रिक सायकल साकार केली. अवघ्या 7 हजार 500 रुपयांत ही ई-सायकल ओमने तयार केली आहे. 

या सायकलची चाचणी यशस्वी झाली असून, आता ती व्यवस्थित चालू आहे. एकदा चार्ज केली की ती 15 किमी चालते. साधारण ताशी 15 ते 20 किमी तिचा वेग आहे. विशेष म्हणजे, बाजारात असलेल्या ई-सायकली पेडलद्वारे चालविता येत नाहीत. पण, ओमने तयार केलेली सायकल बॅटरी संपली तरी नेहमीप्रमाणे पेडलद्वारे चालविता येते. पेडलद्वारे आपोआप बॅटरी चार्ज होईल अशी यंत्रणा या सायकलला बसविण्याचा प्रयोगही तो लवकरच करणार आहे. 

एवढ्या लहान वयातही त्याचे मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक आणि इलेक्‍ट्रिकल ज्ञान असाधारण आहे. या आधीही त्याने विज्ञानावर आधारित अनेक प्रयोग केलेले आहेत. त्याने छोटे नाण्यांचे एटीएम मशिन व वॉटर टॅंक सेंसरचे प्रोजेक्‍ट केलेले आहेत. तसेच, सध्या शाळेमध्ये शॉक ऍब्सॉर्बरवर आधारित स्पीडब्रेकरद्वारे वीजनिर्मिती करून ती एलईडी दिव्यांसाठी वापरण्याच्या प्रोजेक्‍टवर तो काम करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Om Misal 13 year boy created E-cycle at Rajgurunagar in pune