झोपडीतून चेतवली शिक्षणाची ज्योत 

पांडुरंग सरोदे 
बुधवार, 8 मार्च 2017

मला शाळांमधील विद्यार्थी गळती थांबवायची आहे. अर्धवट शिक्षण सोडलेल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यांना चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा द्यायच्या आहेत. जागा मिळेल तिथे "ओपन क्‍लास' घेऊन वस्त्यांमधील मुलांच्या शिक्षणाचा टक्का वाढवायचा आहे. 
-ओंकार मोरे 

"क्रांती एका दिवसाने नाही, तर टप्प्याटप्प्याने होते' असा सल्ला दिला. हाच ओंकारच्या आयुष्यातील "टर्निंग पॉइंट' ठरला. त्यामुळे ओंकार सामाजिक कार्याकडे ओढला गेला. 

जन्मापासूनच झोपडीतील आयुष्य ओंकार मोरे याच्या वाट्याला आले. पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या आई-वडिलांनी शिक्षण घेण्यास सांगितले. पण सभोवतालचे वातावरणच शिक्षणाला "खो' घालत होते. त्यावर मात करत तो बी.ई. इलेक्‍ट्रॉनिक झाला, त्याने काही काळ नोकरीही केली, पण त्याला आजूबाजूची परिस्थिती आणि घटनांनी अस्वस्थ केले. डॉ. बाबा आढाव यांच्या चळवळीने प्रेरित झालेल्या 24 वर्षीय ओंकारने गलेलठ्ठ नोकरी करण्यापेक्षा वस्तीतील मुला-मुलींचे आयुष्य घडविण्याला प्राधान्य दिले. "अभ्यासिका विद्यार्थी समिती'मार्फत ओंकार व त्याची "यंग ब्रिगेड' समाज घडविण्यासाठी आता सज्ज झाली आहे. 

शहराच्या पूर्व भागातील 232, घोरपडी पेठ. हा भाग झोपडपट्टी, वाडे व महापालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा आहे. याच वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य करणारे मंगला व चंद्रकांत मोरे हे दांपत्य. त्यांना दोन मुले व दोन मुली, अशा सहा जणांचे कुटुंब. त्यामध्ये ओंकार हा दुसऱ्या नंबरचा मुलगा. आई मंगला या महापालिकेत चतुर्थश्रेणी म्हणून काम करत, तर वडील कुशन मेकरचा व्यवसाय करणारे. दोघेही कष्टकरी. मुलांना शिक्षणाचा मार्ग त्यांनी दाखविला, मात्र परिस्थिती आणि अल्पशिक्षणामुळे ते मुलांना मार्गदर्शन करू शकत नव्हते. त्यामुळे काय शिकावे, करिअर कशात करावे, याचे ओंकारला मार्गदर्शन मिळाले नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी आई-वडिलांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. या कर्जाचा डोंगर इतका वाढला, की दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असे. अनेकदा शेजाऱ्यांकडून मिळालेल्या शिळ्या अन्नावरच दिवस काढावे लागल्याची आठवण ओंकार सांगतो. त्याचवेळी अभ्यासासाठी घोरपडे उद्यानात जात असताना ओंकारला डॉ. बाबा आढाव यांच्या चळवळीत काम करणाऱ्या गणेश मेरगू यांची भेट घडली. ओंकारला पडणाऱ्या असंख्य प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी मेरगू ओंकारला पुस्तके देत. या पुस्तकांनीच ओंकारला जगाची ओळख करून दिली. त्याला शिकविले आणि घडविले. 

तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने सिलिंडरचे दर वाढविले. त्यामुळे गोरगरीब कुटुंबांचे किती हाल होतील, या प्रश्‍नाने ओंकारला अस्वस्थ केले. त्यात तो आजारीही पडला. तेव्हा मेरगू यांनी ओंकारला "क्रांती एका दिवसाने नाही, तर टप्प्याटप्प्याने होते' असा सल्ला दिला. हाच ओंकारच्या आयुष्यातील "टर्निंग पॉइंट' ठरला. त्यामुळे ओंकार सामाजिक कार्याकडे ओढला गेला. आपल्यासारखी वेळ वस्तीतील मुला-मुलींवर येऊ नये, म्हणून ओंकारने परिसरातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजीचे मार्गदर्शन, करिअर गायडन्स, मोफत शिकवणी असे उपक्रम राबविले. महापालिकेच्या शाळांमधील गैरकारभार आंदोलनाद्वारे चव्हाट्यावर मांडला. मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिकाही सुरू केली. एवढ्यावरच न थांबता ओंकारने नुकतीच लोकवर्गणी गोळा करून महापालिकेची निवडणूकही लढविली. "एक मत शिक्षणासाठी' ही संकल्पना त्याने लोकांसमोर मांडली. इंजिनिअरिंग, एम.एस्सी, बी.एस्सी अशी त्याची उच्चशिक्षित मित्रमंडळी त्याच्यासाठी रात्रंदिवस राबली. निवडणुकीत त्याला 836 मतेही मिळाली, त्याहीपेक्षा लोकांचे प्रेम मिळाल्याचे ओंकार सांगतो. 

Web Title: omkar more story