पन्नास हजारांत जमीन लाटणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सासवड - गराडे (ता. पुरंदर) हद्दीतील दरेवाडीच्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये व्याजाने देऊन त्याबदल्यात जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहनअप्पा जगताप या खासगी सावकारास पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार मात्र फरारी झाला आहे. 

सासवड - गराडे (ता. पुरंदर) हद्दीतील दरेवाडीच्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये व्याजाने देऊन त्याबदल्यात जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहनअप्पा जगताप या खासगी सावकारास पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार मात्र फरारी झाला आहे. 

सासवडचे पोलिस निरीक्षक मुगुटलाला पाटील यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी बाळू आबा वाडकर (रा. दरेवाडी- गराडे, ता. पुरंदर) या शेतकऱ्याने फिर्याद दिली. त्यानुसार मुख्य आरोपी मोहनअप्पा जगताप (रा. सासवड, ता. पुरंदर) यास अटक करण्यात आली असून, सहआरोपी मारुती शंकर वाडकर (रा. दरेवाडी- गराडे, ता. पुरंदर) हा फरारी झाला आहे. याबाबतची माहिती अशी, बाळू वाडकर यांना आर्थिक अडचण असल्याने ते उसने पैसे कोण देऊ शकेल का, या शोधात होते. त्या वेळी त्यांना मारुती वाडकर भेटला. त्याने बाळूला सासवड येथील मोहनअप्पा जगताप याच्याकडे आणले. जगताप याने वाडकर यांना ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन कोऱ्या कागदावर सही घेतली. पैसे परत दिल्यानंतर हा कागद परत देतो, असे सांगितले. वर्षानंतर बाळू वाडकर पैसे परत देण्यास गेले, तेव्हा जगताप याने सहीचा कोरा कागद परत देण्यास नकार दिला. ‘‘तुझ्या नावावर असलेल्या तुझ्या हिश्‍श्‍याच्या जमिनीची मी इसार पावती करून घेतली आहे. मला ती जमीन लिहून दे, अन्यथा १ लाख १० हजार रुपये दे, त्यानंतरच सहीचा कागद घेऊन जा,’’ असे धमकावले. त्यानंतर ‘दहा लाख रुपये किंवा जमिनीचे खरेदीखत करून दे,’ असा तगादा जगताप याने लावला. त्यामुळे त्रस्त वाडकर यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. फिर्याद नोंदविल्यानंतर हवालदार राजेश पोळ, पोलिस शिपाई अजित माने, अविनाश निगडे यांच्या पथकाने मोहनअप्पा जगताप यास बुधवारी रात्री अटक केली. पोलिस निरीक्षक मुगुटलाला पाटील तपास करीत आहेत. 

Web Title: one arrested for land issue