दुबईला जाण्यासाठी एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा बाळगणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

दुबईला जाण्यासाठी व पैसे वाचविण्यासाठी एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकास अटक केली. रविवारी दुपारी तीन वाजता लोहगाव विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला. 

पुणे : दुबईला जाण्यासाठी व पैसे वाचविण्यासाठी एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकास अटक केली. रविवारी दुपारी तीन वाजता लोहगाव विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला. 

शेख महम्मद युसुफ (वय 46, रा. येवलेवाडी, एनआयबीएम रोड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोहगाव विमानतळावरील इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्याने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे केंद्रीय गृहखात्याअंतर्गत येणाऱ्या लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमिग्रेशन विभागामध्ये कार्यरत आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता फिर्यादी हे इमिग्रेशन काऊंटर क्रमांक पाच येथे काम करीत असताना एअर इंडियाच्या विमानाने (फ्लाईट क्रमांक आयएक्‍स 211) दुबईला जाण्यासाठी एक प्रवासी निघाला होता. काऊंटरवर आल्यानंतर फिर्यादी त्यांच्याकडील व्हिसाची तपासणी करीत होते. त्यावेळी त्याच्याकडे एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा आढळून आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर दुबईला जाण्यासाठी व 'पीओई'चे पैसे वाचविण्याच्या उद्देशाने दोन व्हिसाचा वापर केल्याचे सांगितले.

दरम्यान, फिर्यादी यांनी याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दाखल करुन त्यास पोलिसांकडे सुपुर्द केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested at the pune airport with two visas of the same number