पुणे : बनावट तिकीट दाखवून विमानतळाच्या आत प्रवेश करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

शिंदे याने त्याचा कारमालक मालुसरे याच्याकडून इंडिगो एअरलाइन्सचे बनावट तिकीट मोबाईलवर मागविले. त्यानंतर त्याने हे तिकीट प्रवेशद्वारवर दाखवून विमानतळाच्या आत प्रवेश केला.

पुणे : बनावट विमान तिकीट दाखवून पुणे विमानतळाच्या आत बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या एका कार चालकास विमानतळ सुरक्षा रक्षकांनी पकडले. संबंधित कार चालकास विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. 

सुधीर बाळकृष्ण शिंदे (वय 40, रा. खडकवासला) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव असून कारचा मालक सुमित दिलीप मालुसरे (रा. सोमवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज राममूर्ती (वय 43) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालुसरे हा कारचा मालक असून शिंदे हा त्याच्या कारवर चालक म्हणून कार्यरत आहे. शिंदे हा गुरुवारी (ता. 14) सायंकाळी पावणे पाच वाजता एका प्रवाशाला सोडण्यासाठी विमानतळावर आला होता. त्यानंतर प्रवासी कारमधून उतरुन सरळ विमानतळाच्या आत गेला. त्यामुळे शिंदे याला त्याच्याकडून प्रवासभाडे घेता आले नाही. त्यामुळे शिंदे याने त्याचा कारमालक मालुसरे याच्याकडून इंडिगो एअरलाइन्सचे बनावट तिकीट मोबाईलवर मागविले. त्यानंतर त्याने हे तिकीट प्रवेशद्वारवर दाखवून विमानतळाच्या आत प्रवेश केला. दरम्यान त्याच्या हालचालीवरुन सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या तिकीटाची पाहणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शिंदे यास विमानतळ पोलिसांकडे देण्यात आले.

Web Title: one arrested who entered the pune airport by showing a fake ticket