एक कोटीचे दिवाळी अंक खपले 

नीला शर्मा 
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

महिला, पर्यावरण, निसर्ग, भटकंती, शारीरिक व मानसिक आरोग्य, वैचारिक, खास  मुलांसाठीचे असे प्रकार दिवाळी अंकांमध्ये पहायला मिळत आहेत. वाचनसंस्कृती लयाला जात असल्याचे एकीकडे बोलले जात असताना दिवाळी अंकांचा तरुणाई ते ज्येष्ठ, असा खरेदीदार वाचकवर्ग दिसणे, हीसुद्धा भाषा व संस्कृतीच्या जतनाच्या दृष्टीने दिवाळीच म्हणायला हवी.

पुणे - दिवाळी अंकाच्या बाजारपेठेतील खपाने एक कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जाहिरातींचा पाठिंबा पुरेसा नसल्याने अंक वेळेत निघतील का, अशी धाकधूक मोडीत काढत अंक थोड्या फार विलंबाने दाखल झाले. पाऊस व निवडणुकीचा ज्वर ओसरल्यावर विकलेही गेले. यामुळे दिवाळी अंकांच्या व्यवहारातील निरनिराळ्या घटकांनी "हुश्‍श' केले आहे. 

पुण्यातील दिवाळी अंकांच्या बाजारपेठेतील दोन महत्त्वाची केंद्रे म्हणून "संदेश' व "पूनम' या एजन्सी ओळखल्या जातात. संदेशचे चैतन्य खरे म्हणाले, "पुण्यात एक कोटी व संपूर्ण महाराष्ट्रात पाच कोटींच्या आसपास यंदा दिवाळी अंकांची विक्री झाली. निवडणुकीमुळे जाहिरातींची संख्या रोडावली. छापखान्यांतही प्रचारसाहित्याचे काम दणक्‍यात सुरू असल्याने अंक उशिरा बाजारात आले. त्यात पावसाने ऐन दिवाळीत गडबड उडवली. मात्र निवडणूक संपताच आणि योगायोगाने तेव्हा पावसानेही उसंत घेताच दिवाळी अंक खरेदीला बहर आला. 

पूनम एजन्सीचे श्रीकांत भुतडा यांनी सांगितले की, अनेक स्टॉलधारक आमच्याकडून अंक नेतात. त्यांच्याकडून पंधरा नोव्हेंबरच्या आसपास उरलेले अंक परत येतील. तेव्हा खपाचा नेमका अंदाज सांगता येईल. पण एकूण सर्वत्र अंकाची विक्री उत्तम असल्याचे कळते आहे. आमच्याकडून खास दिवाळी अंक लायब्ररी चालवणारे खरेदीदार आहेत. बॅंक, विमा, रेल्वे आदी आस्थापनांमधील कर्मचारी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे सुमारे दोनशे समूह  आमच्याकडून दिवाळी अंक घेतात. दीडशेच्या जवळपास शीर्षके या वर्षी आहेत. दरात फारशी वाढ झाली नाही. 

वाचनसंस्कृतीला चालना 
महिला, पर्यावरण, निसर्ग, भटकंती, शारीरिक व मानसिक आरोग्य, वैचारिक, खास  मुलांसाठीचे असे प्रकार दिवाळी अंकांमध्ये पहायला मिळत आहेत. वाचनसंस्कृती लयाला जात असल्याचे एकीकडे बोलले जात असताना दिवाळी अंकांचा तरुणाई ते ज्येष्ठ, असा खरेदीदार वाचकवर्ग दिसणे, हीसुद्धा भाषा व संस्कृतीच्या जतनाच्या दृष्टीने दिवाळीच म्हणायला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore Diwali magazine sales in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: