बेशिस्त वाहनचालकांकडून वसूल केला लाखोंचा दंड

Helmet-rule-breakers
Helmet-rule-breakers

वडगाव शेरी : विमानतळ वाहतूक पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला असून, मागील चार महिन्यांत अशा चालकांकडून एक कोटीचा दंड वसूल केला आहे. त्यात सर्वाधिक दंडाची वसुली हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांकडून करण्यात आली आहे. 

नगर रस्त्यावर विमाननगर, खराडी, चंदननगर, वडगाव शेरी या भागामध्ये पोलिस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत असल्याचे चित्र दररोज चौकाचौकांत पाहायला मिळत आहे. जानेवारी ते एप्रिल या मागील चार महिन्यांत वाहतूक पोलिसांनी सुमारे 26 हजार 800 वाहनचालकांवर विविध कारणांस्तव कारवाई केली आहे. त्यात सर्वाधिक 13 हजार 970 दुचाकीचालकांवर हेल्मेट नसल्याने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 66 लाख 76 हजार सहाशे रुपये इतका दंड वसूल केला आहे. एकेरी वाहतूक असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या 714 वाहनचालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून चार लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

सिग्नल तोडणाऱ्या 366 आणि वाहन चालवण्याचा परवाना सोबत न ठेवणाऱ्या 332 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 148 वाहनचालकांवर कारवाई केली असून दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या 110 जणांवर कारवाई करून 29 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सायलेन्सर काढल्याने मोठा आवाज करणाऱ्या दुचाकींच्या चालकांकडून 70 हजारांचा दंड वसूल केला आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 256 चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच, विविध कारणांस्तव 88 वाहनचालकांचा परवाना जप्त करण्यात आला आहे. 
 
यांच्यावर कारवाई का नाही? 
लक्‍झरी बस, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहणाऱ्या सहा आसनी रिक्षा, ओला, उबर, जड वाहने आणि रिक्षांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. 

वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला घोळक्‍याने दंड वसुली करण्याबरोबरच वाहतूक नियमन करण्याकडेदेखील लक्ष द्यावे. कारण नागरिकांना नगर रस्त्यावर आणि परिसरात दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 
- महेश गलांडे, रहिवासी 

वाहनचालकांनी शिस्त पाळावी आणि हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती केली जात आहे. सुरक्षित प्रवास आणि सुरक्षित वाहतूक होण्यासाठी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चालकांवरील कारवाई यापुढेही सुरूच राहील. 
- जितेंद्र कोळी, पोलिस निरीक्षक, विमानतळ वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com