एक दिवस पुस्तकांसोबत...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पुणे - ‘‘माझी काही मराठी पुस्तके वाचायची राहून गेली आहेत. पुण्यात कुठे चांगली पुस्तके मिळतील...’’ अशी विचारणा खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पुण्यातील जवळच्या सहकाऱ्यांना केली आणि त्यानंतर काही वेळातच त्यांची गाडी ‘अक्षरधारा’जवळ येऊन थांबली. त्यापुढचा जवळपास एक तास चव्हाण पुस्तकांच्या सानिध्यात आणि एकांतात रमले. यानिमित्ताने नेहमी लोकांच्या गराड्यात असलेले हे व्यक्तिमत्त्व पुस्तकांच्या गराड्यात पाहायला मिळाले.

एका कार्यक्रमानिमित्त चव्हाण दोन दिवसांसाठी पुण्यात आले होते. बुधवारी सकाळी लवकर उठून त्यांनी आपले सहकारी डॉ. सतीश देसाई यांना दूरध्वनी केला. ‘इथे पुस्तकांचे चांगले दालन कुठे आहे? चला आपण जाऊ’ असे ते म्हणाले. त्यानंतर डॉ. देसाई त्यांना घेऊन ‘अक्षरधारा’मध्ये आले. ते येणार हा निरोप आणि त्यांची गाडी एकावेळी ‘अक्षरधारा’मध्ये पोचली. त्यामुळे ‘अक्षरधारा’तील कर्मचाऱ्यांची काहीशी धावपळ उडाली असली, तरी चव्हाण मात्र पुस्तकांच्या विश्‍वात रमले. ‘महाराष्ट्र संस्कृती’, ‘जागर’, ‘जातीसंस्थेचा इतिहास’, ‘अजिंक्‍य योद्धा बाजीराव’, ‘हाती ज्यांच्या शून्य होते’, ‘ब्रेकआउट नेशन’, ‘हाफ लायन’, ‘यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण’ अशी वेगवेगळी पुस्तके त्यांनी खरेदी केली.

या वेळी मराठी प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाखडे, कार्यवाह रमेश राठिवडेकर, प्रकाशक अप्पा परचुरे, ‘अक्षरधारा’च्या संचालिका रसिका राठिवडेकर, सुनील चव्हाण उपस्थित होते. द्विभाषिक पुस्तकाच्या खरेदीवरून सध्या प्रकाशकांमध्ये वाद सुरू आहेत. याबाबत प्रकाशकांनी एकत्र येऊन आपले प्रश्न सरकारसमोर मांडणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकांबद्दल ते म्हणाले, ‘‘पुस्तकांचा सहवास महाविद्यालयीन जीवनापासून आहे. मात्र, अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना पाच वर्षे अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पुस्तके वाचण्याची संधी मिळाली नाही आणि त्या काळी पुस्तकेही आजच्यासारखी सहज मिळत नव्हती. सध्या प्रवासादरम्यान मी पुस्तके वाचतो अन्‌ संपवतोही.’’

डॉ. ढेरे यांच्या साहित्यकृती जतन व्हाव्यात
पुस्तक खरेदी झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या निवासस्थानी गेले. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. डॉ. ढेरे यांच्या साहित्यकृती जतन व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते.

Web Title: one Day with books