Pune News : अखेर मागण्या मान्य झाल्याने आमरण उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

one-day strike Swabhimani Shetkar Sangathan pmc school education student teacher

Pune News : अखेर मागण्या मान्य झाल्याने आमरण उपोषण मागे

बालेवाडी : येथील मनपा शाळा क्रमांक १५२ व १२१ कै. बाबुराव गेनुजी बालवडकर शाळेत जवळजवळ १६०० पटसंख्या असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार सूचना देऊनही फरक पडत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (ता. ९) रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

पण याची दखल कोणीही अधिकाऱ्यांनी न घेतल्याने पुढे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. परंतु मनपा शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत यांनी स्वतः शाळेत येऊन शाळे संदर्भातील मागण्याबद्दल लेखी आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे उपोषण शाळेतल्या मुलांकडून नारळ पाणी देऊन मागे घेण्यात आले.

बालेवाडी येथील म.न.पा.च्या कै. बाबुराव बालवडकर शाळेत पट संख्या चांगली आहे. परंतु मुलांना बसायला वर्ग कमी आहेत, पाणी वेळेवर व पुरेसे नाही त्यामुळे स्वच्छतेचा अभाव, अपूरे स्वच्छतागृह , शिक्षक कमी आहेत ,

शिपाई कमी असल्यामुळे मुलांना शाळेची साफसफाई करावी लागते , खेळासाठी मैदान नाही अशा अनेक समस्या असल्याने बालेवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी याविषयी शिक्षण विभाग तसेच महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते,परंतु त्यावर काहीच उपाय योजना न झाल्याने त्यांनी एक दिवसीय उपोषणाला सुरुवात केली.

परंतु याची दखल कोणीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न घेतल्याने बालवडकर यांनी( ता.९) रोजी आमरण उपोषण सुरू केले. शाळेतली मुलं व त्यांचे पालकही काही काळ या उषणामध्ये सहभागी झाले .( ता.१०) हा उपोषणाचा दुसराच दिवस होता, याभागातील सर्व राजकीय पक्ष, प्रतिष्ठित नागरिकानी या ठिकाणी येऊन या उपोषणास पाठिंबा दिला.

या उपोषणाची दखल घेऊन शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत यांनी स्वतः बालेवाडी येथे येऊन शाळेविषयी ज्या काही मागण्या आहेत, त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर, शाळेतील लहान मुलांकडून नारळ पाणी देऊन बालवडकर यांनी उपोषण मागे घेतले.

बालवडकर यांच्या पत्नि शोभा यांनी ही घरी उपोषण केले होते, त्यानीही यावेळी हे उपोषण सोडले. यावेळी साहाय्यक प्रशासकीय अधिकारी औंध- सुरेश उचाळे , बाणेरचे माजी प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर,

अशोक मुरकुटे, प्रकाश दशरत बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, हनुमंत बालवडकर, दिलीप बालवडकर चतुशृंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका पार्वती गोडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण विभागाला ही अनेक कामासाठी मनपा च्या इतर विभागावर अवलंबून रहावे लागते, पाठ पुरावा करावा लागतो. या शाळेसाठी प्रशस्थ मैदान, व नविन इमारतीसाठी या भागामध्ये शाळेसाठी जी आरक्षित जागा आहे, त्या संदर्भात भवन विभाग व अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शालेय विभागाच्या अखत्यारीत जे विषय असतील ते प्राधान्याने सोडवले जातील. यासंदर्भात या ठिकाणी लेखी निवेदन देण्यात आले आहे.

शिक्षण प्रमुख - मिनाक्षी राऊत.