पुण्याच्या महापौरांची पाणीकपात रद्दची घोषणा हवेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

वडगाव जलकेंद्राच्या कक्षेत आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद 

पुणे: पाणीकपात रद्द होऊनही वडगाव जलकेंद्राच्या कक्षेत येणाऱ्या परिसरात आठवड्यातून विभागवार एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

पुणे: पाणीकपात रद्द होऊनही वडगाव जलकेंद्राच्या कक्षेत येणाऱ्या परिसरात आठवड्यातून विभागवार एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

या महिन्यात पहिल्या दोन आठवड्यांत समाधानकारक पाऊस झाला होता. खडकवासला धरण भरले होते. त्याच वेळी खडकवासला प्रकल्पातील धरण साखळीत पन्नास टक्के पाणीसाठा झाला होता. खडकवासला धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यामुळे 14 जुलैला महापौरांनी पाणीकपात रद्द केल्याची घोषणा करतानाच शहराला दररोज एकच वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतरही वडगाव जल केंद्रांतर्गत परिसरात विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. तसेच गुरुवारी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. ज्या भागात कपातीचा दिवस आणि दुरुस्तीचा दिवस जोडून येतो त्या भागात सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहून तिसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाणीकपात रद्द होताच पावसाने दडी मारल्यामुळे पाणीपुरवठा विभागाने सावध पवित्रा घेऊन कपात कायम ठेवली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाणीकपातीची घोषणा झाली असली तरी, तसे आदेश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले नसल्याचे विभागातूनच नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. धनकवडी गाव, आंबेगाव पठार, आंबेगाव, कात्रज, कात्रज-कोंढवा रस्ता परिसर, सहकारनगर, कोंढवा या परिसरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. सहकारनगरच्या काही भागांत बुधवारी पाणीकपातीचा दिवस आणि गुरुवारी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने पाणी येत आहे.
गुरुवारी दुरुस्तीचा बंद आणि शुक्रवारी पाणीकपातीचा दिवस असलेल्या भागाला शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्यातही सलग तीन दिवसांच्या पाणी समस्येत अडकलेल्या नागरिकांनी पाणीकपात रद्द या घोषणेची अंमलबजावणी करा, अशी मागणी केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One day water supply close in Ambegaon, Katraj area