घशात उकडलेले अंड अडकल्याने मनोरूग्णाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

उकडलेले अंड खाताना कामठे यांच्या घशात अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णाचा मृत्यू जंतू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे पोलिसांना कळविले आहे.
 

येरवडा - येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात उकडलेले अंडे खातात ते घशात अडकल्याने राजेंद्र नामेदव कामठे (वय ५२, रा. सासवड) यांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. ९) अशक्त रुग्णांना अतिरक्त पौष्टीक आहार देताना ही घटना घडली. या आहारात शेंगदाणा लाडू, उकडलेले अंडे आणि केळे दिले जाते. यातील उकडलेले अंड खाताना कामठे यांच्या घशात अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णाचा मृत्यू जंतू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे पोलिसांना कळविले आहे.

‘मनोरूग्णालयात चार महिन्यांत ३० मृत्यू’ ही बातमी 'सकाळ'मध्ये रविवारी प्रसिद्ध होताच रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर अनेकजण रुग्णालयातील वेगवेगळ्या घटना नाव न छापण्याच्या अटीवर सांगत आहेत. रुग्णालयात बुधवारी दुपारी नेहमी प्रमाणे अशक्त रुग्णांना अतिरिक्त पौष्टिक आहार देण्यात येत होता. त्यावेळी कामठे यांना देण्यात आलेल्या आहारातील शेंगदाणा लाडू आणि उकडलेले अंडे घाईघाईने खाताना अंडे त्यांच्या घशात अडकल्यामुळे त्यांना मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना आपत्कालीन कक्ष (वॉर्ड क्रमांक २७) घेऊन जाण्यात आले. तेथे त्यांच्या घशातून अंडे काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. पोलिसांनी कामठे यांच्या मृतदेहाचा पंचनाम करून तो शवविच्छेदनासाठी ससूनमध्ये पाठविण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी नेहमी प्रमाणे कामठे यांच्या मृत्यू जंतूसंसर्गामुळे झाल्याचे सांगितले. मात्र ससूनच्या शवविच्छदनाचा अहवालाची प्रतिक्षा असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.

दिवाळमध्ये सुनंदा खरे (वय ६३, रा. रविवार पेठे) यांचा रुग्णालयात वाटण्यात येणाऱ्या मिठाईमधील बाकरवडी घशात अडकून मृत्यू झाला होता. त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाला जाग आली नाही. रुग्णांना उखडलेले अंडे तुकडे न करताच देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्ण घाईघाईने जेवण करतात त्यामुळे घशात अन्नपदार्थ अडकून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना रुग्णालयात होऊन सुद्धा रुग्णालय प्रशासनाला शहाणपण न आल्याचे आश्‍चर्य वाटते.

रुग्णालयातील तीनजणांनी पिले फिनले!
मनोरूग्णालयातील प्रेरणा कक्ष, निरीक्षणगृह आणि रुग्णालय कक्षातील प्रत्येकी एका रुग्णाने फिनेल पिल्याची घटना समोर आली आहे. रुग्णांना तत्काळ ससूनमध्ये दाखल केल्यामुळे त्यांचा जीव वाचविता आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. येथील सफाई ठेकेदाराचा निष्कळजीपणा चव्हाटावर आल्याचे दिसते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: one dies in yervada mental hospital