पुणे : 'आज तुला संपवितो' म्हणत दोघांकडून तरुणावर कोयत्याने वार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पाठीमागुन दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांना अडविले. "तुम्हाला मस्ती आली आहे का, तक्रार का करतो, आज तुला संपवितो' अशा शब्दात धमकी देत प्रमथमेशला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोघांनी प्रथमेशवर कोयत्याने वार केले.

पुणे : मित्रासमवेत कामावर निघालेल्या एका तरुणास दोघांनी अडवून मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथील राजगड चाळीच्या परिसरातील एका दुकानासमोर घडली. 

प्रथमेश रमेश चव्हाण (वय 19, रा. सुखसागरनगर, कात्रज ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश चव्हाण (वय 20, रा. बिबवेवाडी ) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश व आकाश हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मंगळवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास दोघेजण कंपनीमध्ये कामाला जात होते. दोघेजण राजगड चाळीजवळील बर्थडे हाऊस दुकानासमोर आले. त्यावेळी पाठीमागुन दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांना अडविले. "तुम्हाला मस्ती आली आहे का, तक्रार का करतो, आज तुला संपवितो' अशा शब्दात धमकी देत प्रमथमेशला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोघांनी प्रथमेशवर कोयत्याने वार केले. या घटनेमध्ये प्रथमेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोघेजण पळून गेले.

दरम्यान, आकाशने स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रथमेशला उपचारांसाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. बी. काळे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Injured in sharp Weapon attack in Pune