एक लाख नव्या सदनिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

एफएसआयची मर्यादा वाढविल्याने मध्य भागात ५ लाख नागरिकांना लाभ

पुणे - शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना दाट लोकवस्तीमध्ये चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) मर्यादा वाढविल्यामुळे मध्य पुण्याच्या पेठांत सुमारे एक लाख सदनिका नव्याने बांधल्या जाऊ शकणार आहेत आणि त्याचा लाभ तब्बल पाच लाख नागरिकांना होणार आहे. कमी जागेत अधिक नागरिकांना सामावून घ्यायचे झाल्याने उंच इमारतींची संख्या वाढून मुंबईच्या दिशेने वाटचाल होणार आहे. दाट वस्तीत लोकसंख्येची घनता किमान तीस टक्‍क्‍यांनी वाढणार असल्याने त्यांना पुरेशा नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर असेल.

दाट लोकवस्तीमध्ये यापूर्वी २.३७ ‘एफएसआय’ वापरण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. विकास आराखडा मंजूर करताना आता ही मर्यादा रस्त्यांच्या रुंदीनुसार ३.८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचा फायदा मध्यवस्तीतील पेठांना होणार आहे. मध्यवस्तीत जुने वाडे मोठ्या प्रमाणावर असून त्यात भाडेकरूंची संख्याही मोठी आहे. तसेच ३०-३५ वर्षांपूर्वीच्या इमारतींचीही संख्या मोठी आहे. ‘एफएसआय’च्या धोरणात सुसूत्रता नसल्यामुळे जुने वाडे-इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. विकास आराखडा मंजूर करताना एफएसआयचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तसेच भाडेकरूंना प्रत्येकी १०० चौरस फूट क्षेत्राचा एफएसआयही मिळणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणात एफएसआयची तरतूद वाढविण्याचाही निर्णय झाल्यामुळे त्याचा काही प्रमाणात नागरिकांना फायदा मिळणार आहे. त्यातच मध्यभागातील रस्ता रुंदी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुनर्विकासासाठी एफएसआय वाढवून दिल्यामुळे मध्यभागातील विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शहरांतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. नागरिकांनाही घराजवळच रोजगाराच्या संधी मिळू शकतील. मात्र, त्यासाठी महापालिकेने पाणी, कचरा, सांडपाणी वाहिन्या आदी 

सुविधा पुरेशा मिळतील, याची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मेट्रोचाही एफएसआय मिळणार 
पिंपरी-स्वारगेट मेट्रोचा मार्ग शिवाजीनगरमधून शिवाजी रस्त्याने जाणार आहे. त्याच्याही दुतर्फा चार एफएसआय मिळेल, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाच्या दुतर्फा चार एफएसआयमुळे उंच इमारती उभारल्या जाऊ शकतील. परिणामी मेट्रो झोनच्या क्षेत्रातील जुने वाडे, इमारती यांनाही चार एफएसआयचा नियम लागू होऊ शकतो. त्यातून मध्यभागात अधिक घरे निर्माण होण्याची चिन्हे आहेत.  

पुरेशा पायाभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान 
मध्यभागात उंच इमारती उभ्या राहण्याची शक्‍यता आता वाढली आहे. मात्र, वाढणाऱ्या घरांना पिण्याचे पाणी, त्यांच्यासाठी सांडपाणी वाहिनी, कचऱ्याचे व्यवस्थापन, वाहने उभी करण्यासाठी जागा आदींचे प्रभावी नियोजन करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यात यश आल्यासच वाढीव एफएसआयचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

तत्त्वतः सकारात्मक निर्णय 
याबाबत ज्येष्ठ वास्तुविशारद प्रदीप पेठे म्हणाले, ‘‘मध्य पुण्यात जुन्या घरांची संख्या जास्त असल्यामुळे तेथे पुनर्विकास होणे काळाची गरज आहे. उंचीच्या प्रमाणात एफएसआय वापरण्याचे प्रमाण ठरणार असल्यामुळे त्याचा परिणाम अभ्यासणे गरजेचे आहे. सध्या २४ मीटर उंचीच्या इमारतींनाही परवानगी आहेच. तसेच आठ मजली इमारतीमध्ये तीन एफएसआय वापरता येतो. जिने, सज्जा यांचा समावेश वाढीव एफएसआयमध्ये केला आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्याचे निराकरण होणे गरजेचे आहे.’’ परंतु, मध्यभागाच्या पुनर्विकासासाठी एफएसआय वाढवून देण्याचा निर्णय तत्त्वतः चांगला असून त्याचे सकारात्मक परिणाम घडू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: one million new flats