पुणे जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या एकने घटणार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

राज्याच्या आगामी मंत्रिमंडळात शहर व जिल्ह्यातील दोनच मंत्री असणार आहेत. यामध्ये एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश असेल.

पुणे : राज्यातील नव्या मंत्रिमंडळात पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंत्र्यांच्या संख्येत एकने कपात होणार आहे. त्यामुळे राज्याच्या आगामी मंत्रिमंडळात शहर व जिल्ह्यातील दोनच मंत्री असणार आहेत. यामध्ये एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा एकही आमदार निवडून न आल्याने, या पक्षाच्या कोट्यातील एक मंत्रिपद पुणे जिल्ह्याऐवजी अन्य जिल्ह्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

विधान परिषदेवरील सदस्य किंवा पराभूत उमेदवाराला मंत्रिपदावर संधी न देण्याची मागणी सेनेच्या एका गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी सेनेच्या कोट्यातील मंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे.          

सद्यस्थितीत सेनेकडे पुणे शहरातील डॉ. नीलम गोऱ्हे  या एकमेव आमदार आहेत. परंतु त्या विधान परिषदेच्या आमदार असून, त्यातही त्यांच्याकडे सध्या विधान परिषद उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे गोऱ्हे यांचे नाव पुणे जिल्ह्यातील मंत्रिपदाच्या स्पर्धेत येते की नाही, याबाबत शंका असल्याचे जिल्ह्यातील एका सेना नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

विद्यामान मंत्रिमंडळात भाजपचे दोनपैकी एक कॅबिनेट आणि सेनेचे एक राज्यमंत्री अशी तीन मंत्रिपदं होती. भाजपच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्रिपद तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांना देण्यात आले होते. दोन राज्यमंत्री पदापैकी प्रत्येकी एक पद भाजप व सेनेला देण्यात आले होते.

मावळत्या विधानसभेतील सेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना जलसंधारण तर, भाजपचे कँटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले होते. पुढे बापट हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

कांबळे यांच्याकडील मंत्रिपद काढून घेऊन ते मावळचे भाजप आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना देण्यात आले होते. सेनेने मात्र पाचही वर्षे विजय शिवतारे यांच्याकडेच मंत्रिपद कायम ठेवले होते.          

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवतारे आणि भेगडे या दोन्ही राज्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Ministership will reduced from Pune District