Pune News : शिवरी येथे रानडुकराच्या हल्यात एक व्यक्ती जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

One person injured in wild boar attack at Shivri pune

Pune News : शिवरी येथे रानडुकराच्या हल्यात एक व्यक्ती जखमी

खळद : शिवरी (ता.पुरंदर)येथे मदनझळा परिसरामध्ये लोक वस्तीमध्ये रानडुकराने हल्ला केल्याने येथील अंकुश रामचंद्र आरडे( वय ६५) हे जखमी झाले असून त्यांच्या वरती ससून येथे उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार या परिसरामध्ये रानडुकरांकडुन मोठ्या प्रमाणावर पिके उध्वस्त केली जात आहेत तर हिंस्र वन्य प्राण्यांकडून जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

अशातच सोमवार रात्री दीड वाजण्याच्या सुमारास परिसरामध्ये कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने आरडे हे उठून बाहेर आपल्या गाईच्या गोठ्यात पाहायला गेले असता पाठीमागून रानडुकराने त्यांच्यावरती हल्ला केला.

याबाबत वन विभागाच्या वतीने परींचे विभागाचे वनपाल अनिल खोमणे व सहका-यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले मात्र शेतकऱ्यांचे याच्यावर समाधान झाले नसून,

आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवले मात्र नुकसान भरपाई मिळण्यास दिरंगाई होते तर मिळणारी रक्कमही नुकसानीच्या पटीत अगदी तुटकुंजी असल्याचे शेतकरी नाराज आहेत. या भागात सतत होणारा रानडुकरांचा त्रास तर बिबट्या,तरसाचे जनावरावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

यावर वनविभागाच्या वतीने अधिकारी शेतीच्या संरक्षणासाठी शेतशिवाराला काटेरी कंपाऊंड करावे तर, जनावरांच्या संरक्षणासाठी बंदिस्त गोठे करावे असे सांगत आहेत . मात्र या डोंगर रंगांमध्ये व परिसरामध्ये हजारो इतर असे जमीन असल्याने सर्व शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही तरी वनविभागानेच आपल्या क्षेत्राला कंपाऊंड करावे जेणेकरून वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होईल. अशी मागणी या भागातील शेतकरी ,ग्रामस्थांनी केली आहे.