एकतर्फी प्रेमातून अपहरणाचा बनाव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

अविनाश देवराम वैरागर (वय 22) असे त्याचे नाव आहे. त्याने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचे कोणीतरी अपहरण केले असून, त्याला मारहाण करीत आहे, असे मित्र रवींद्र चव्हाण याला सांगितले.

पुणे - मुलीने प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. विमाननगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

अविनाश देवराम वैरागर (वय 22) असे त्याचे नाव आहे. त्याने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचे कोणीतरी अपहरण केले असून, त्याला मारहाण करीत आहे, असे मित्र रवींद्र चव्हाण याला सांगितले. रवींद्रने ही बाब अविनाशच्या घरी सांगितली. अज्ञात व्यक्‍तीने जबरदस्तीने मुलाला पळवून नेल्याची तक्रार आईने मंगळवारी विमानतळ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे आणि सहायक आयुक्‍त वसंत तांबे यांच्या सूचनेनुसार विमानतळ पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. मोबाईल ट्रॅकिंगवरून अविनाश हा पुणे रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. परंतु, तिने नकार दिल्यामुळे निराशेपोटी आणि मुलीला त्रास होण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा खोटा बनाव रचल्याचे उघडकीस आले. 
 

Web Title: One-sided affection for kidnapping conspiracy