अर्चनाला 'एल एन - 4' चा मदतीचा हात

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सर्वांवर जिद्दीने मात करीत आपल्या थोट्या हातांनी पेपर सोडवत नुकतीच 'तीने' दहावीची परिक्षाही दिली. तिच्या या जिद्दीला आता 'एल एन - 4' या कृत्रीम हाताने मदतीचा हात दिला आहे.

मांजरी : दोन्हीही हात थोटे, दुसऱ्याच्या मदतीशिवाय कोणतेही काम करणे अवघड, ते करताना करावी लागणारी कसरत आणि वाढत्या वयाबरोबर निर्माण होणाऱ्या समस्या, या सर्वांवर जिद्दीने मात करीत याच थोट्या हातांनी पेपर सोडवत नुकतीच तीने दहावीची परिक्षाही दिली. तिच्या या जिद्दीला आता 'एल एन - 4' या कृत्रीम हाताने मदतीचा हात दिला आहे. या हाताच्या मदतीने ती लिहिण्या-खाण्यासह विविध कामे करू शकणार असल्याने या सावित्रीच्या लेकीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला आहे.

लहानपणी दोन्हीही हात चुलीच्या निखाऱ्यात पडून मनगटांपर्यंत जळाल्याने सातारा पाटण येथील गवळीनगरची अर्चना सिदू यमकर पंधरा वर्षांपूर्वी दिव्यांग झाली. त्यावर मात करीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत तीने दहावीची परिक्षा दिली आहे. नुकतीच तिच्या जिद्दीची कहाणी 'सकाळ'ने प्रसिद्ध केली होती. तिच्या या जिद्दीचे कौतुक करण्याबरोबरच अनेकांनी हळहळही व्यक्त केली. तीच्या मदतीसाठी अनेक हातही पुढे आले आहेत. मात्र तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक हात 'एल एन - 4'  च्या रुपाने पुढे आला आहे. रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन व महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अर्चनाला हडपसर येथे फक्त दिखाऊ नव्हे तर प्रत्यक्ष कामाला येऊ शकणारा हात मोफत बसविण्यात आला आहे. अत्याधुनिक, सोपा व सुटसुटीत असलेल्या 'एल एन - 4' या कृत्रीम हाताने ती विविध कामे करू शकणार आहे. 

महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनील गुजर, मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक अमोल झगडे, रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊनचे जितू मेहता, राजेंद्र नहार, प्रदीप मुनोत, ओनी काकाजीवाला, रिचर्ड लोबो व प्रशिक्षक हसन शेख यांच्या उपस्थितीत अर्चनाला हा हात बसविण्यात आला आहे. प्रशिक्षक शेख यांनी या हाताच्या वापराबाबत तीला प्रशिक्षणही दिले आहे. या हाताने ती लिहिने, चमचा हातात घेऊन खाणे, मगातून पाणी पिणे, केस विंचरणे आदी विविध कामे लिलया करू लागली आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. जीवनाबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. 

'हडपसरचे सानेगुरुजी आरोग्य मंडळ, पूना डाऊनटाऊन रोटरी क्लब, आमच्या गावातील निवृत्ती साळुंके व सकाळमुळे मला या हाताची मदत झाली आहे. माझ्या जीवनात त्यामुळे मोठी क्रांती झाली आहे. माझ्यातील आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढला आहे. मी आता अनेक कामे करू शकत असल्याचा आनंद होत असून निश्चितपणे या हाताच्या मदतीने मी चांगले यश मिळवू शकेल.'
- अर्चना यमकर

 

Web Title: one social foundation give LN 4 hand to handicap Archana Yamkar