पुण्याला उद्यापासून एकवेळ पुरेसे पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे आता शंभर टक्के भरल्याने येत्या मंगळवारपासून (ता. ६) संपूर्ण शहराला रोज एकवेळ पुरेसे पाणी मिळणार आहे.

पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे आता शंभर टक्के भरल्याने येत्या मंगळवारपासून (ता. ६) संपूर्ण शहराला रोज एकवेळ पुरेसे पाणी मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गतची आठवड्यातून एक दिवस होणारी कपात थांबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे नवे वेळापत्रक तयार केले असून, मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले.  

धरणांत अपुरा पाणीसाठा असल्याने दीड-पावणेदोन महिन्यांपूर्वी वडगाव जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार कात्रज, धनकवडी, कोंढवा आणि सिंहगड रस्त्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अपुरे पाणी मिळत आहे. ऐन पावसाळ्यात पाणीकपात सुरू असल्याने नागरिकांनी प्रचंड तक्रारी केल्या होत्या. ही कपात रद्द करून शहराला रोज एकवेळ पुरेसे पाणी देण्याचा आदेश  महापौर मुक्ता टिळक यांनी केला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, गेल्या आठवड्यापासून शहरासह धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरण साखळीत शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे वडगाव जलकेंद्रातून सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.

गेडाम म्हणाले, ‘‘पाण्याचे नियोजन म्हणून या केंद्रातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, धरणे भरल्याने मंगळवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. सर्वच भागांत पुरेशा दाबाने पाणी पुरविण्यात येईल.’’

पावसातही टॅंकर
दमदार पावसामुळे धरणे भरली. नदीपात्रात पाणी सोडले गेले. परिणामी, रस्त्यावर पाणीच पाणी होते. सिंहगड रस्ता, कात्रज, धायरी परिसरात मात्र रविवारी पाणीकपात होती. एवढ्या प्रमाणात पाऊस असूनही या भागातील लोकांना पाण्यासाठी टॅंकरची मागणी करावी लागली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One time water from tomorrow to Pune