वन डे ट्रीपसाठी तिकोना किल्ला खुणावतोय

गोरख माझिरे
रविवार, 28 जुलै 2019

पावसाळ्यातील "वन डे पिकनिक स्पॉट' म्हणून प्रसिद्ध असलेला मावळ-मुळशीच्या सीमेवरील तिकोना किल्ल्यावर मुंबई, लोणावळा तसेच पुण्यातील पर्यटकांनी रविवारी सकाळी सातपासूनच गर्दी केली होती. शिवदुर्ग संवर्धन संस्थेने केलेल्या नोंदीप्रमाणे दोन हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली.

कोळवण ः पावसाळ्यातील "वन डे पिकनिक स्पॉट' म्हणून प्रसिद्ध असलेला मावळ-मुळशीच्या सीमेवरील तिकोना किल्ल्यावर मुंबई, लोणावळा तसेच पुण्यातील पर्यटकांनी रविवारी सकाळी सातपासूनच गर्दी केली होती. शिवदुर्ग संवर्धन संस्थेने केलेल्या नोंदीप्रमाणे दोन हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली.

आठवडाभर पडलेल्या पावसामुळे गडावरील वातावरण बदलल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. धुक्‍यात हरवलेल्या गडावरचे वातावरण अनुभवण्यासाठी आणि पावसात गरमागरम कांदा भजी, पिठलं-भाकरी खाण्यासाठी पर्यटकांनी शनिवारीही गर्दी केली होती; पण रविवारी गर्दीने उच्चांक केला. सकाळपासूनच गर्दी वाढल्यामुळे अकराच्या दरम्यान गडाखालचे पार्किंग फुल्ल झाले होते. परिसरातील सर्व हॉटेल्स, कृषी पर्यटन केंद्रे पर्यटकांच्या गर्दीने हाउसफुल्ल झाली. मुळशी व मावळच्या वेशीवर असणाऱ्या या किल्यावर श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था पुरातत्त्व खात्याच्या परवानगीने दुर्गसंवर्धनाचे कार्य करते. गडावर संस्थेने सुजित मोहोळ व माऊली मोहोळ हे दोन गडपाल नेमले आहेत. रविवारी गडपालाबरोबर स्वयंसेवी कार्यकर्ते दररोज गड स्वच्छ ठेवून येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवतात. गडावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून गस्त घालून दोन ठिकाणी प्रथमोपचाराची सोय केलेली आहे. संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद आहे.

पर्यटकांनी गडांचे पावित्र्य राखून अनुचित प्रकार घडू नयेत, याकडे लक्ष द्यावे. गडावर शांततेत, घाई- गडबड न करता जाऊन येणे. सायंकाळी पाच वाजता किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात येतात. त्यामुळे दुपारी उशिरानंतर किल्ल्यावर येणे टाळावे, असे पुणे येथील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे आकाश मारणे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oneday Picnic Spot In Pune