कांद्याला फुटले कोंब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

निरगुडसर - कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी अनेक महिने साठवणूक केलेल्या कांद्याला आता कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

निरगुडसर - कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी अनेक महिने साठवणूक केलेल्या कांद्याला आता कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्‍यांतील शेतकरी दरवर्षी सर्वाधिक कांदा लागवड करतात. मागील वर्षीही एकरी हजारो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती, परंतु शेतकऱ्याला चांगला बाजारभाव न भेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी चाळी उभारून कांद्याची साठवणूक केली. गेल्या अनेक महिन्यापासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा विक्रीसाठी पाठवला नाही. सध्याच्या परिस्थितीतही कांद्याला कवडीमोल बाजारभाव आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी जुना कांदा विक्रीसाठी आणू नये असे फलक लावले आहे. त्यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, जवळे, भराडी, निरगुडसर, खडकी, थोरांदळे आदी भागातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली आहे. अनेक महिने चाळीत साठवलेला कांदा आता सडू तर लागला आहे. आता या कांद्याला कोंबदेखील येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तरी सरकारने नुकसान झालेल्या कांद्याची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Onion