मंचरला कांद्याचे भाव कोसळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १) कांद्याचे बाजारभाव कोसळले. प्रति दहा किलोमागे १५० रुपयांनी बाजारभाव घटले आहेत.

मंचर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १) कांद्याचे बाजारभाव कोसळले. प्रति दहा किलोमागे १५० रुपयांनी बाजारभाव घटले आहेत. निर्यातबंदीपूर्वी प्रति दहा किलोचा बाजारभाव ४५० रुपये होता. मंगळवारी दहा किलो कांद्याला ३०० रुपये बाजारभाव मिळाला. कांदा साठा करण्याची मर्यादाही लागू केल्याने खरेदीदार व्यापारी नाराज झाले आहेत.  

मंचर बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या समक्ष कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. रविवारी (ता. २९) सकाळी कांद्याची विक्री प्रति दहा किलोला ४०० रुपये ते ४५० रुपयापर्यंत गेली होती. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्याची माहिती समजल्यानंतर खरेदीदार व्यापाऱ्यांची चलबिचल झाली. व्यापाऱ्यांनी बाजारातून काढता पाय घेतला होता. पण तोपर्यंत जवळपास कांद्याची खरेदी झाली होती.

सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. डिझेल, पेट्रोल, खते, बियाणे, औषधे यांचे वाढलेले बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करत नाही. पण, कांद्याचे बाजारभाव वाढले की तत्काळ निर्यात बंदी  केली जाते. हा कांदा उत्पादकांवर अन्याय आहे.    
- फकिरा गेनभाऊ वळसे पाटील, कांदा उत्पादक शेतकरी, निरगुडसर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices fell down in Manchar