esakal | शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले पाणी; भावात घसरण सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले पाणी; भावात घसरण सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर - केंद्र सरकारडून कांद्याच्या (Onion) आयात-निर्यात धोरणात धरसोड सुरू असल्याचा आणि कोरोनामुळे (Corona) बाजार बंद (Market Close) असल्याचा फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसू लागला आहे. नवीन कांदा बाजारपेठेत येण्याआधीच कांद्याच्या भावात (Rate) घट सुरू झाली आहे. लोणंद (जि. सातारा) बाजार समितीत झालेल्या लिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याचा भाव प्रतिक्विंटल अडीचशे रुपयांनी घसरला. (Onion Rate Decrease by Market Close Coronavirus)

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात गरवी कांद्याला किमान ५०० ते कमाल १७५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव होता. परंतु, आज झालेल्या लिलावात तो भाव ४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलवर घसरला. एप्रिलमध्ये कांद्याला ४०० ते ११०० रुपये; तर मेमध्ये ५०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. जूनमध्ये ७०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव गेल्याने शेतकऱ्यांना भाववाढीची आशा होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही कांदाचाळीत जपून ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी विक्रीस आणायला सुरुवात केली होती.

हेही वाचा: ‘जिसका माल, उसका हमाल’च्या अंमलबजावणीस देशात प्रारंभ

लोणंद बाजार समितीतील गरवा कांद्याचे दर

तारीख प्रतिक्विंटल दर (रुपयांत)

१७ जून ७०० ते १९५१

१ जुलै ५०० ते १७००

८ जुलै ५०० ते १७५०

१५ जुलै ४०० ते १५००

केंद्राच्या धरसोड वृत्तीचा फटका

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीतील धरसोड वृत्तीमुळे भारताच्या हातातील आखाती देशांची बाजारपेठ पाकिस्तानच्या हातात गेली आहे. जागतिक व्यापार समितीत जपान, अमेरिका देशांनी याबाबत तक्रारीही केल्या आहेत. यापूर्वी बांगलादेशानेही खडे बोल सुनावले होते. या पार्श्वभूमीवर निर्यातीत मोठी घट होऊ लागली आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बाजारपेठा, आठवडे बाजार, हॉटेल, ढाबे हेही सुरू केले जात नसल्याने देशांतर्गत खपही घटला आहे. नव्या कांद्याचीही ऑगस्टमध्ये आवक सुरू होणार आहे.

कांदाकाढणी झाली तेव्हा बाजार चांगले नव्हते म्हणून कांदाचाळीत कांदा साठवून ठेवला होता. गुंतविलेले भांडवल आणि कांदाचाळीतील खर्च याचा विचार करता तीन हजारापर्यंत बाजारभाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, भाव घसरल्यास मोठा फटका बसेल.

- बाळासाहेब कोरडे, कांदा उत्पादक

loading image