कांद्याने शेतकऱ्यांना रडवले!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

टाकळी हाजी - येथील शेतकरी महिला मनीषा संजय बारहाते यांनी ३२ गोणी कांदा बाजारपेठेत पाठवल्यावर खर्च वजा जाता अवघे चार रुपये हाती आले.

टाकळी हाजी - येथील शेतकरी महिला मनीषा संजय बारहाते यांनी ३२ गोणी कांदा बाजारपेठेत पाठवल्यावर खर्च वजा जाता अवघे चार रुपये हाती आले.

तुटपुंजी शेती व त्यात कुकडी नदीला येणारे काही काळाचे आवर्तन, यातून शेती व्यवसाय बारहाते या करतात. जनावरांसाठी चारा, गहू, बाजरी आणि डाळिंबाची शेती या सारखी पिके घेतात. या वर्षी डाळिंबाला बाजारभाव मिळाला. त्यामुळे त्यांनी प्रपंचातील भांडवल कांदा पीक घेण्यासाठी गुंतविले होते. बियाणे, पाणी व्यवस्थापन, खुरपणी, काढणी, वाहतूक, मजुरी यामध्ये हजारो रुपये खर्च केले होते. या पिकात जेमतेम भांडवल वसूल होऊन भविष्यात वेगळ्या पिकाला भांडवल उभे करण्याची त्यांची इच्छा होती. चार दिवसांपूर्वी ३२ गोणी कांदा पारनेर तालुक्‍यातील बाजारपेठेत पाठवला. या त्यांच्या कांद्याला प्रतिकिलोला साधारण एक ते दोन रुपये भाव मिळाला. या कांद्याची पट्टी साधारण २ हजार ३६२ रुपये तयार करण्यात आली. यामध्ये आडत, मोटार भाडे उचल, हमाली, लेव्ही, तोलाई, वराई, भराई, बारदाना व इतर खर्च वजा जाता ३२ गोण्यांचे अवघे चार रुपये पट्टी हातात मिळाली आहे.

कृषिमंत्र्यांना मनीऑर्डर
बारहाते यांना ३२ गोणी कांदा उत्पादन करण्यासाठी चार हजार रुपये खर्च आला होता. मात्र, अवघे चार रुपये हातात मिळाले. त्यामुळे प्रपंचातील गुंतविलेले भांडवल नाहीसे होऊन कर्ज काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांनी मात्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी शिरूर येथील टपाल कार्यालयातून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना चार रुपयांची मनीऑर्डर केली. तसेच, त्यांच्या पत्नीस बांगड्या कुरिअर केल्या आहे.

शेतीमालातून बाजारभाव मिळाला नाही की शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. वारंवार शेतीमालाला कमी बाजारभाव व निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुधाला बाजारभाव नाही, कर्ज काढून कांदा चाळी केल्या, पण त्यालाही बाजारभाव नाही. त्यामुळे जगायचे कसे? प्रपंच चालवायचा कसा? सरकार विरोधात महिलांनी रस्त्यावर उतरावे.
 - मनीषा बारहाते 

Web Title: Onion rate Decrease Farmer Manisha Barhate