कांदा भडकला; ६० रुपये भाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नाश्‍त्यापासून ते सर्व भाज्यांमध्ये चवीसाठी कांदा वापरला जातो. परंतु कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने गेल्या काही दिवसांपासून महिन्याचे भाजीपाल्याचे बजेट कोलमडले आहे, त्यामुळे कांदा भाजीमध्ये अत्यल्प प्रमाणात वापरला जातो.
- सत्यभामा जाधव, गृहिणी

पुणेे - राज्यातील कांदा उत्पादित क्षेत्रातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे, तर काही भागात पाऊसच न पडल्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांदा ५५ ते ६० रुपयांवर पोचला आहे.

राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादित भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा भिजून त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर नवीन कांद्याची होणारी लागवड देखील धोक्‍यात आली आहे. सद्यःस्थितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे जुन्या कांद्याचा साठा शिल्लक आहे. तोही काही प्रमाणातच आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे भाव वाढत आहेत. प्रतिदहा किलोस गुरुवारी घाऊक बाजारात ३५० ते ४०० रुपये कांद्याला भाव मिळाला. आठवड्यात सरासरी ५० ते ६० ट्रक इतकी दररोज आवक होत असल्याची माहिती किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली. 

राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील साठवून ठेवलेला कांदा जवळपास संपत आला आहे. तसेच आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात देखील नवीन कांद्याची तुरळक आवक होत आहे. त्यामुळे या राज्यांमधून महाराष्ट्रातील जुन्या दर्जेदार कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे सगळीकडूनच मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसघशीत वाढ होत आहे.

कांदा व्यापारी रितेश पोमण म्हणाले, ‘जुना कांदा वखारीत ठेवून जवळपास सहा महिने झाले असल्यामुळे सद्यःस्थितीत खराब कांद्याचे प्रमाण वाढलेले आहे. दर्जेदार कांद्याची आवक कमी होत आहे. तसेच या कांद्याला परराज्यांतून मागणी वाढली आहे. राज्यामध्ये अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचे पीक धोक्‍यात आले आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Rate Increase