अतिवृष्टीमुळे कांदा महागला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

राज्यासह, कर्नाटकात बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गेल्या काही दिवसांत कांद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. बाजारात कांद्याची प्रतिकिलोस दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी भाववाढ या वर्षी झाल्याचे कांदा व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले.

मार्केट यार्ड - राज्यासह, कर्नाटकात बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गेल्या काही दिवसांत कांद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. बाजारात कांद्याची प्रतिकिलोस दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी भाववाढ या वर्षी झाल्याचे कांदा व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले. 

मार्केट यार्डात कांद्याला प्रतिदहा किलोस प्रतवारीनुसार ४०० ते ६०० रुपये भाव मिळत आहे. रविवारी बाजारात ८० ट्रक कांद्याची आवक झाल्याची माहिती विभाग प्रमुख बाबा बीबवे यांनी दिली. तर किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार कांदा ७० ते ८० रुपये किलो झाल्याची माहिती किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली. 

सध्या बाजारात कर्नाटक, मध्य प्रदेशातून नवीन कांदा येत आहे. परंतु त्याचा दर्जा खालवलेला आहे. त्याचबरोबर नवीन कांद्याची होणारी लागवडदेखील धोक्‍यात आली आहे. जुन्या मागणीत वाढत असल्याने दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे भाव वाढत असल्याचे यादव यांनी सांगितले.

पुढील १० ते १५ दिवस पाऊस राहिला, तर वर्षभर कांदा तेजीत राहील. सध्या पावसामुळे कांदा खराब झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढलेला नाही. इजिप्तचा कांदा बाजारात आहे. परंतु त्याला उठाव नाही.
- गणेश यादव, कांदा व्यापारी, मार्केट यार्ड

कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांदा महागल्याने खरेदी करावा की नाही हा प्रश्‍न पडतो. परंतु त्याच्यामुळे भाजीला चव येते. त्यामुळे कांदा भाजीमध्ये अत्यल्प प्रमाणात वापरला जात आहे.
- संगीता शेळके, गृहिणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Rate Increase by Heavy Rain