कांदा बाजारात नव्हे तर उसाच्या शेतात खतासाठी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मे 2017

खानापूर (ता. शेवगाव) येथील राजेंद्र आव्हाड या शेतकऱ्याने तर कांद्याची विक्री करून मातीमोल दराने कांदा विकण्यापेक्षा उसाच्या शेतात खत म्हणून त्याचा वापर केला. 

नगर : जिल्ह्यात शेतमालाला चांगला दर मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेले शेतकरी पिके कशी घ्यावीत, या विवंचनेत आहेत. मागील पाच वर्षांपूर्वी कांद्याला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकरी या पिकाकडे वळाले. त्याचा परिणाम सध्या कांद्याचे भरपूर उत्पन्न होत आहे.

पण दर कमी असल्याने हे पीक वाहतुकीलाही परवडत नाही. खानापूर (ता. शेवगाव) येथील राजेंद्र आव्हाड या शेतकऱ्याने तर कांद्याची विक्री करून मातीमोल दराने कांदा विकण्यापेक्षा उसाच्या शेतात खत म्हणून त्याचा वापर केला. 

नगर तालुक्‍यातील ससेवाडी, जेऊर, कौडगाव, पिंपळगाव आदी भागातील शेतकऱ्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. नगरच्या बाजार समितीत कांदे विक्रीसाठी नेतात. तेथे चांगला बाजारभाव मिळाले नसल्याने बहुतेकांनी कांदा सध्या चाळीतच ठेवणे पसंत केले आहे. शेवगाव तालुक्‍यातील बोधेगाव, मुंगी, दहिफळ, खुंटेफळ, दहिगाव, कऱ्हेटाकळी हा धरणालगतचा पट्ट्यात कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. तेथील शेतकऱ्यांना हा कांदा मोठ्या बाजारपेठेत नेणे परवडत नाही.

परिणामी बहुतेक शेतकरी त्याचे खत करू लागले आहे. श्रीगोंदे भागातील शेतकरी पुण्याच्या बाजारपेठेत कांदा नेतात. उत्तरेतील तालुक्‍यांतून वांबोरीच्या बाजारात कांदा पाठविला जातो. सध्या मात्र दर कमी झाल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहे. कांदा न विकता घरात ठेवावा व तर सडून जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

Web Title: Onions are being used as fertilizers in Nagar