बाजारात कांदा महागच ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - कांद्याचे दर नाशिकमध्ये घसरले तरी सहकारनगर, धायरी, औंध, विमाननगर, चंदननगर, घोरपडी परिसरात कांदा 15 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे; तर उर्वरित शहरात 10 - 15 रुपये प्रतिकिलोने कांदा मिळत आहे. कात्रज, वारजे, खडकवासला परिसरात मात्र दहा रुपये प्रतिकिलोने कांदा ग्राहकांना मिळत आहे. घाऊक बाजारात कांदा स्वस्त झाला तरी नफेखोरीमुळे बहुसंख्य ग्राहकांना कांदा चढ्या दरानेच विकत घ्यावा लागत आहे. 

शहराच्या बाहेर कांदा 8 ते 10 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. मात्र, नव्याबरोबरच जुन्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू राहिल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात काद्यांच्या दरातील घसरण सुरूच राहिली आहे. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्याचे दर 50 ते 120 रुपये आहेत. मात्र, किरकोळ बाजारात कांद्याचा किलोचा दर 10 ते 20 रुपये कायम असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे घाऊक बाजारात चांगला दर मिळत नसल्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे, तर दुसरीकडे किरकोळ व्यापारी मात्र नफेखोरी करीत आहेत. 

पावसाळ्यापूर्वी कांद्याला चांगला दर असल्यामुळे पुढे ते आणखी वाढतील, असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी कांद्याची मोठी साठवणूक केली. असे असताना नवा कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली. मात्र, कांद्याचे दर टिकून राहिले. नव्या कांद्याबरोबरच जुन्या कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याचे दर घसरण्यास सुरवात झाली. आजदेखील घाऊक बाजारात जुन्या कांद्याची पन्नास, तर नवीन कांद्याची पन्नास अशी शंभर ट्रक आवक झाली. 

आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने कांद्याच्या दरातील घसरण सुरूच आहे. चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे दहा किलोचे दर 50 ते 100 रुपये आणि त्याच प्रतीच्या नव्या कांद्याचे दहा किलोचे दर 80 ते 120 रुपये असे आहेत. 
- विलास भुजबळ, व्यापारी, मार्केट यार्ड 

घाऊक बाजारातील कांद्याचे दर (रुपयांत, प्रती 10 किलो) 
जुना कांदा 50 ते 100 
नवीन कांदा 80 ते 120 

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील कांद्याचे दर (रुपयांत, प्रतिकिलो) 
कात्रज, वारजे, खडकवासला - 10 
येरवडा, कोथरूड, खडकी, गोकूळनगर - 10 ते 15 
सहकारनगर, धायरी, औंध, विमाननगर, चंदननगर, मुंढवा, घोरपडी, उंड्री - 15 ते 20 

Web Title: Onions are expensive in the market

टॅग्स