ऑनलाइन कंपन्यांमुळे मिळतोय रोजगार

Online
Online

गोखलेनगर - मी गेल्या एक वर्षापासून झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. यामुळे दिवसाला मला एक हजार ते अकराशे रुपये मिळू लागले. त्यामुळे माझा बेरोजगारीचा प्रश्‍न सुटला... सांगत आहे गोखलेनगर-जनवाडीतील अनिल खुडे. अशा कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्याचा तरुणांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहनही त्याने केले.

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत सर्व काही ऑनलाइन मिळू लागले आहे. विविध कंपन्यांनी ऑनलाइन बाजारपेठ निर्माण केली आहे. झोमॅटो, उबर इट्‌स, स्विगी, फूड पांडा यासह अनेक कंपन्या या क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे जशी घरबसल्या नागरिकांना सेवा मिळत आहे, तसा तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. 

घरपोच सेवा मिळत असल्याने विद्यार्थिवर्ग या सेवेला जास्त पसंती देत आहे. पव्हेलियन मॉल, सेनापती बापट रस्ता येथे असलेले हॉटेल ‘हॉट मोमोज अँड बर्गर’ या हॉटेलच्या खाद्यपदार्थांना अधिक मागणी आहे. या हॉटेलमधून कोथरूड, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, खडकी, बोपोडी, सदाशिव पेठ, नारायण पेठ, डेक्कन, औंध, पाषाण, बाणेर आदी ठिकाणीचे ग्राहक खाद्यपदार्थ मागवतात.

पुणे शहरासह उपनगरात असे कित्येक तरुण आहेत की जे दिवसाला सरासरी सातशे ते पंधराशे रुपये रोजगार मिळवत आहेत. यात ग्रामीण भागातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. झोमॅटो, उबर इट्‌स, स्विगी, फूड पांडा अशा ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या कंपन्यांनी जवळपास शहरातील ९० टक्के हॉटेलसोबत करार केले आहेत. दर गुरवारी या ऑनलाइन कंपन्या हॉटेलची रक्कम हॉटेलमालकांच्या खात्यावर जमा करतात. उत्तर भारतीय नागरिक आइस्क्रीम, ज्यूस, सॅंडविच, चायनीज, बिर्याणी, थंड पेय, बर्गर या खाद्यपदार्थांची ऑर्डर जास्त प्रमाणात करत असल्याचे खुडे याने सांगितले.

अशी असते सेवा
  ऑर्डर केल्यापासून १० ते १५ मिनिटांत सेवा
  साधारण ८ किलोमीटर अंतरावर सेवा
  दिवसात १४ ऑर्डर पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना २०० ते २५० रुपये जादा
  दररोज साधारण १० ते १२ तास मुले काम करतात

कंपनीनुसार एका ऑर्डरमागे मिळणारी रक्कम
  झोमॅटो - ४० रुपये       स्विगी - ३५ रुपये
  उबर इट्‌स - ४० रुपये       फूड पांडा - ४० रुपये

मी ऑनलाइन कंपन्यांशी करार केला असून, हॉटेलचा व्यवसाय ६० टक्के ऑनलाइन होतो. ऑनलाइन कंपन्यांमुळे व्यवसायात वाढ झाली. स्टार रेटिंगनुसार ग्राहक हॉटेल निवडतात.
-  बिपिन वाघ, मालक, हॉट मोमोज ॲण्ड बर्गर

चायनीज, बर्गर, बिर्याणी, चिकन, भाजीपाला, थंड पेय, चपाती असे विविध पदार्थ ऑनलाइन मागवतो. त्यामुळे आमचा वेळ वाचतो, पैशाची देखील बचत होते.
- अर्णब चटर्जी, विद्यार्थी, ग्रीन थंब सोसायटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com