ऑनलाइन घोळाचा एजंटांना फायदा

सचिन बडे
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे - नागरिकांच्या सोयीसाठी ‘नॅशनल इन्फॉर्मॅटिक्‍स सेंटर’ने (एनआयसी) तयार केलेल्या ‘परिवहन’ आणि ‘सारथी’ या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी काही दूर होण्यास तयार नाही. त्यामुळे विविध कामांसाठी अर्ज भरताना नागरिकांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा फायदा एजंटांना होत असल्याचे दिसून आले आहे. 

आरटीओ कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी व्हावी, एजंटांचा सुळसुळाट कमी व्हावा आणि घरबसल्या सुविधा प्राप्त व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून या दोन्ही ऑनलाइन संगणक प्रणालींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली; परंतु यातील अडचणी दूर करण्यात एनआयसीला यश आलेले नाही. वारंवार सर्व्हर बंद पडणे, वीजपुरवठा खंडित होणे, सिस्टिमवर ताण येणे असे अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. त्यामुळे नागरिकांना या अनेक अडचणी येत असल्याने एजंटांचे फावत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट दिल्यानंतर दिसून आले. 

ही ऑनलाइन सुविधा सुरू झाल्यानंतरही कार्यालयाच्या परिसरात तीनशे ते साडेतीनशे एजंट असल्याचे दिसून आले. लर्निंग लायसन्स, एनओसी, गाडी नावावर करणे अशी अनेक कामे करण्यासाठी नागरिक एजंटांची मदत घेत असल्याचे पाहावयास मिळाले.

‘‘ऑनलाइन प्रणाली चांगली आहे. मात्र त्यामध्ये विविध अडचणी येतात. काही नागरिकांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाही. या प्रणालीला दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने, आम्हाला एजंटांची मदत घ्यावी लागते,’’ असे एका नागरिकाने सांगितले. ‘‘नागरिकांना ऑनलाइन प्रणालीविषयी माहिती नाही. अर्ज करण्याच्या किचकट पद्धतीमुळे काही त्रुटी राहिल्यास अर्ज बाद होतो. त्यामुळे नागरिक जास्तीचे पैसे देऊन आमच्याकडून कामे करून घेतात,’’ असे एका एजंटने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: Online confussion RTO agent